कल्याण : गेल्या आठवड्यात कसारा-सीएसएमटी लोकलमध्ये आसनगाव येथील काही प्रवाशांना लोकलमध्ये २० लाख रूपयांची रक्कम असलेली पिशवी आढळून आली होती. कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे ही पिशवी प्रवाशांनी जमा केली होती. या पिशवीच्या मूळ मालकाचा शोध सुरू असताना, हा मालक स्वताहून लोहमार्ग पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने पिशवी आणि रोख रकमेची साद्यंत माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी त्याची रोख रकमेची पिशवी त्या प्रवाशाला परत केली.
सचिन बोरसे असे या व्यक्तिचे नाव आहे. ते धुळे जिल्ह्यात सौर उर्जा सयंत्र बसविण्याच्या कामाची कंत्राटे घेतात. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी एके ठिकाणी पैसे भरणा करायचे असल्याने बोरसे २० लाखाची रोख रक्कम घेऊन धुळे येथून गेल्या आठवड्यात मुंबईत येत होते. कसारा येथे लोकलमध्ये बसल्यावर त्यांनी जवळील पिशवी लोकलमधील मंचावर ठेवली. लोकल मुंबईच्या दिशेने धाऊ लागल्यावर काही वेळाने बोरसे यांना डुलकी लागली.
लोकलमधील प्रवाशांचा एक गट कल्याण रेल्वे स्थानकात उतरला. त्यांनी सचिन बोरसे यांची पिशवी नजरचुकीने स्वताची पिशवी म्हणून उतरून घेतली. फलाटावर उतरल्यावर त्यांना ही पिशवी आपली नसल्याचे समजले. त्यांनी ती पिशवी उघडून पाहिली तर त्यात पैसे होते. या प्रवाशांच्या गटाने ती पिशवी कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिली. २० लाखाची रक्कम पाहून पोलीस आवाक झाले होते. पोलिसांनी या पिशवीच्या मालकाचा शोध सुरू केला होता. बोरसे सीएसएमटी येथे उतरण्याच्या तयारीत होते. त्यांना मंचकावर पिशवी नसल्याचे आढळले. अज्ञात प्रवाशाने ती चोरून नेली असल्याचा संशय त्यांना आला. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी कसारा ते कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यानचे सीसीटीव्ही चित्रण तपासून पिशवीच्या मालकाचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी ही पिशवी ज्याची असेल त्याने ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन केले होते.
हे ही वाचा…ठाणे : कळव्यामधील एका शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना विषबाधा
दरम्यानच्या काळात मुंब्रा येथून लोहमार्ग पोलीस ठाण्यात एक इसम आला. त्याने २० लाख रूपये रक्कम असलेली पिशवी आपली असल्याचा दावा केला. पोलिसांनी २० लाख रूपये कोठुन आणले याचे पुरावे सादर कर आणि त्याप्रमाणे तुला पिशवी परत केली जाईल, असे सांगितले. हे ऐकून संबंधित इसम पोलीस ठाण्यातून गेल्यावर परत आला नाही. आपली पिशवी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात असल्याचे समजल्यावर ठेकेदार सचिन बोरसे पोलीस ठाण्यात आले. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आपण ही रक्कम घेऊन मुंबईत येत होतो. ही रक्कम आपण बँकेतून काढल्याचे आणि या रकमेसंबंधी सर्व बँक पुरावे सादर केल्यानंतर बोरसे यांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी त्यांची २० लाख रूपये असलेली पिशवी परत केली.
बोरसे यांनी ही पिशवी पोलीस ठाण्यात जमा करणारे प्रवासी आणि लोहमार्ग पोलिसांच्या कृतीविषयी समाधान व्यक्त केले.