ठाणे : बेकायदा बांधकामांसाठी पैसे घेता आणि ही बांधकामे पाडताना लोकांना आमची नावे सांगता, असा आरोप माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्यावर केला आहे. ठाणेकर यांच्यासोबत फोनवरून केलेल्या संभाषणाची ध्वनिफीत आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केली असून त्यात त्यांनी  कळवा येथील बेकायदा बांधकामधारकाकडून २० लाख रुपये घेतल्याचे गंभीर आरोप सुबोध यांच्यावर केले आहेत. तसेच कुणामार्फत पैसे घेतले, त्या व्यक्तीलाच समोर घेऊन येतो, असे आव्हानही त्यांनी सुबोध यांना दिले आहे. तसेच कळव्यात २९ बेकायदा बांधकामे सुरू असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कळवा येथील रोहिदास पाटील यांच्या बांधकामावर मी कारवाई करायला सांगितले, असे तुम्ही त्यांना सांगितल्याचे पाटील यांनी मला स्वतः सांगितले, अशी विचारणा आव्हाड यांनी सुबोध यांना फोनवरून केली. त्यावर सुबोध यांनी नकार देताच आव्हाड यांनी त्यांना फैलावर घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. पाटील यांच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या इतर अनाधिकृत इमारती दिसल्या नाहीत का? असा प्रश्नही आव्हाड यांनीउपस्थित केला. मात्र त्यावर सहाय्यक आयुक्तांची उत्तर देताना भंबेरी उडाल्याचे दिसत आहे.

VIDEO :::

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/01/Audio-clip-viral-on-social-media.mp4

हेही वाचा >>> ‘शिवसेनेचे ठाणे ‘ ठाकरे की शिंदे गटाबरोबर ?

रोहीदास पाटील यांच्याकडून तुम्ही २० लाख घेतल्याचा गंभीर आरोपही आव्हाड यांनी केला. तर हे आरोप चुकीचे असल्याचा दावा सुबोध यांनी केला. त्यावर ज्याने पैसे दिले तो माणूस समोर उभा करु का? असे आव्हान आव्हाड यांनी त्यांना दिले. तुम्ही पैसे घेऊन खिसे भरता आणि माझें नाव पुढे करता, इतर इमारती का पाडत नाही? असा सवालही त्यांनी केला. नवीन चालू असलेली इमारत पाडायची आणि जी पूर्ण झालेली असेल ती इमारत पाडायची नाही का? उद्या चौकशी लागली तर धूर निघेल आणि यात भरडली जातील तुमच्या घरचे असेही त्यांनी सांगितले. तुम्ही सर्वात भ्रष्ट अधिकारी असल्याबाबत आयुक्तांचे मत असून तुमच्यामुळे आयुक्तही हतबल आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. तुमची आणि माझी वयक्तीक लढाई सुरु झाली असून तुम्ही कोणा कोणाकडून पैसे घेता हे दाखवून देईन, उच्च न्यायालयात जाईन असा इशाराही त्यांनी दिला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 lakh rupees bribe illegal construction assistant commissioner kalwa jitendra awhad serious allegation ysh