मुंबईला लागून असलेल्या ठाणे शहरात एकीकडे बडय़ा बडय़ा विकासकांची टोलेजंग गृहसंकुले उभी राहात असताना झोपडय़ांच्या रूपात होणारे शहराचे विद्रुपीकरणही वाढीस लागले आहे. गेल्या दहा वर्षांत ठाणे शहरात सुमारे ५६ हजार नव्या झोपडय़ा उभ्या राहिल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या एका सर्वेक्षणातून पुढे आली असून आजघडीला ठाण्यातील ९ लाख ८० हजार लोकसंख्या झोपडपट्टीत राहात असल्याचेही यातून पुढे येत आहे. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ५३ टक्क्यांच्या आसपास आहे. विशेष म्हणजे, गेल्या दहा वर्षांत झोपडय़ांच्या संख्येत २० टक्क्यांची वाढ झाली आहे.
ठाणे शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी महापालिकेने विविध योजना राबविण्याचा विचार सुरू केला आहे. राज्य सरकारने ठाणे शहरातील झोपडय़ांच्या पुनर्वसनासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला मंजुरी दिली असून या योजनेचे प्रस्ताव पुढे सरकावेत यासाठी ठाणे शहरात झोपुचे कार्यालय सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. याशिवाय मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील झोपडय़ांचे सर्वेक्षण करण्यासाठी लवकरच निविदा काढण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात येणार आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिकेने शहरातील झोपडपट्टयांचा सद्य:स्थिती अहवाल पालकमंत्री एकनाथ िशदे यांना सादर केला. या अहवालातून शहरातील झोपडय़ांबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे.
महापालिकेच्या सर्वेक्षण अहवालानुसार १९८१ ते २००१ या २० वर्षांच्या काळात झोपडपट्टय़ांची संख्या जेमतेम चार ते पाच टक्क्यांनी वाढली होती. त्यावेळी झोपडपट्टय़ांमधून सुमारे चार लाख २० हजार नागरिकांचे वास्तव्य होते. मात्र, २००१ ते २०११ या दहा वर्षांत झोपडय़ांच्या संख्येत तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली असून झोपडपट्टयांमध्ये वास्तव्य करणाऱ्यांचा आकडा नऊ लाख ८२ हजारांच्या घरात पोहचला आहे. हा आकडा साधारणत: ५३ टक्के इतका असून सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणविणाऱ्या ठाण्याला चहूबाजूंनी झोपडय़ांचा वेढा पडल्याचे ठसठशीत वास्तव या अहवालाच्या निमित्ताने पुढे आले आहे. या अहवालाच्या आधारे आता झोपडपट्टीमुक्त शहर करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. त्यासाठी राज्य शासन व केंद्र शासनाच्या विविध योजनेंतर्गत झोपडय़ांचा पुनर्विकास योजना आखली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून अशा योजनांची घोषणा करण्यात आल्या. परंतु दिवसेंदिवस झोपडय़ांच्या संख्येत कैकपटीने वाढ झाली असली तरी योजना मात्र कागदावरच राहिल्या असून त्या अद्याप प्रत्यक्षात उतरू शकलेल्या नाहीत. असे चित्र शहरात पाहाव्यास मिळते.
५३ टक्के ठाणेकर झोपडय़ांत!
मुंबईला लागून असलेल्या ठाणे शहरात एकीकडे बडय़ा बडय़ा विकासकांची टोलेजंग गृहसंकुले उभी राहात असताना झोपडय़ांच्या रूपात होणारे शहराचे विद्रुपीकरणही वाढीस लागले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-05-2015 at 12:35 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 percent slums increased in thane during last ten years