सागर नरेकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर आणि परिसराची वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी जवळपास दोन हजार २२ कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या निविदा बुधवारी जाहीर करण्यात आल्या. वसई खाडीवर तीन नव्या पुलांची उभारणी, शिळफाटा-माणकोली, कल्याण आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील खाडीवरील पुलाचे रुंदीकरण ही कामे राबवण्यात येणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून ठाणे शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असून, त्यासाठी विविध प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली आहे. याच मालिकेत आता ठाणे आणि भिवंडी शहरांना जोडण्यासाठी वसई खाडीवर तीन नव्या पुलांची उभारणी केली जाणार आहे. यात गायमुख ते पाये गाव, कासारवडवली ते खारबाव आणि कोलशेत ते काल्हेर या मार्गाचा समावेश आहे. या तीनही पुलांसाठी एकत्रितपणे १ हजार १६२ कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला ठाणे ते भिवंडी हा प्रवास करण्यासाठी आग्रा महामार्गाद्वारे  कशेळी, काल्हेर आणि अंजूर फाटा असा प्रवास करावा लागतो. यावरून मोठा वेळ खर्ची घालावा लागतो. त्यामुळे हे नवे पूल वाहतुकीसाठी वेळेची आणि इंधनाची बचत करणारे ठरतील.

 वागळे इस्टेट भागात उड्डाणपूल

औद्योगिक वसाहत आणि नामांकित कंपन्यांच्या कार्यालयांमुळे वर्दळीच्या असलेल्या वागळे इस्टेट भागातील स.गो. बर्वे मार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच असून येथे उड्डाणपूल उभारणीसाठी ९८ कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे.

अन्य महत्त्वाचे प्रकल्प

  • ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या शिळफाटा ते माणकोली या मार्गासाठी ६१४ कोटींची निविदा.
  • गांधारी पुलाच्या रुंदीकरणासाठी १४८ कोटी ६२ लाखांची निविदा.
  • वसई ते पालघर जोडण्यासाठी नारिंगी खाडी येथे मार्बल पाडा जेट्टी ते दातिवरे जेट्टी आणि पालघर ते वैतरणा नदीवर पूल उभारणीसाठी ७४१ कोटींची निविदा.
  •   सर्व प्रकल्पांसाठी एकूण २ हजार ७६३ कोटींचा खर्च होणार आहे.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2000 crore worth of tenders in one day strengthening of transport system of thane ysh