ठाणे : महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात महिन्याभरात २१ नवजात बालके मरण पावल्याची माहिती समोर आली आहे. या नवजात बालकांचे वजन कमी असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कळवा रुग्णालयात लहान मुलांसाठी अतिदक्षता विभागात ३० खाटा आहेत. जून महिन्यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ५१२ महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यातील ९० महिलांची  प्रसूतीसाठी नोंदणी करण्यात आली होती. एकूण २९४ महिलांची सिझेरियन प्रसूती झाली. या प्रसूती झालेल्या महिलांच्या आठ नवजात बालकांचा ४८ तासांत मृत्यू झाला.

हेही वाचा >>> डोंबिवलीजवळील पिसवलीत विजेच्या धक्क्याने सात जनावरांचा मृत्यू

ठाणे ग्रामीण भागातील व पालघर जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती असलेल्या महिला जून महिन्यात प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. या महिलांच्या ९० नवजात बालकांचे वजन एक किलो वजनापेक्षा कमी होते. त्यामुळे मृत्यू झालेल्या २१ बालकांपैकी १९ बालके शहराबाहेरील होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

उपाययोजना फोल?

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात याच रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर जाग आलेल्या पालिका प्रशासनाने रुग्णालयाचा ताण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. आता एका महिन्यात २१ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने प्रशासनाच्या नवीन उपाययोजना फोल ठरल्या का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

या प्रकरणाचा अहवाल रुग्णालय प्रशासनाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश बारोट यांच्याकडून मागविण्यात आला आहे. मृत्यू पावलेल्या नवजात बालकांचे वजन हे दीड किलोपेक्षा कमी असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. परंतु, आता याची चौकशी केली जाईल आणि याचा अहवाल  सभागृहसमोर सादर केला जाईल. – उमेश बिरारी, उपायुक्त, ठाणे महापालिका.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 21 newborns die a kalwa hospital during a month zws
Show comments