शहापूर : शहापूर येथील खुटाडी गावाजवळ भातसा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी उघडकीस आला. यश पवार (२१) असे मृताचे नाव असून तो मिरारोड भागात राहतो. यश हा मित्र-मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. मिरारोड येथील काशिमीरामध्ये राहणारा यश हा त्याच्या १५ ते २० मित्र-मैत्रिणीसोबत दुचाकीने फिरण्यासाठी आला होता. खुटाडी गावाजवळ भातसा नदीच्या किनारी पॉवर हाऊस जवळील डोहामध्ये यश पोहण्यासाठी उतरला होता. यश बुडत असल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी पोलिसांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशला नदीतून बाहेर काढण्यात आले. त्याला उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.