कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील जमीन मालक आणि त्यांच्या भागीदारांनी मुंबईतील ताडदेव भागात राहणाऱ्या एका विकासकाची जमीन व्यवहार प्रकरणात २२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. मागील आठ वर्षाच्या काळातील हा व्यवहार आहे.या फसवणूक प्रकरणी विकासक दीपक रमेश मेहता (४७, रा. गिरनार इमारत, ताडदेव, मुंबई) यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीप्रमाणे गौरीपाडा येथील रहिवासी बीपिन नारायण गाडे, लक्ष्मीबाई नारायण गाडे, रजनी रवींद्र चौधऱी, आशा संतोष साबळे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, आरोपी गाडे आणि चौधरी यांची गौरीपाडा येथे मालकी, कब्जे हक्काची जमीन आहे. ही जमीन विकासक दीपक मेहता यांनी एप्रिल २०१५ मध्ये आरोपी गाडे, चौधरी, साबळे यांच्याकडून साठे करार पध्दतीने एक कोटी ५१ लाख रुपयांना खरेदी करण्याचे निश्चित केले होते. व्यवहार नक्की झाल्यानंतर जमीन मालक, कब्जेवहिवाटदार आरोपींनी दस्त नोंदणीव्दारे खरेदीखत करण्यासाठी विकासक दीपक मेहता यांना तगादा लावला. विविध कारणे देऊन आरोपी टाळाटाळ करू लागले. साठे खत करारानाम्याप्रमाणे ठरलेल्या रकमेपैकी २२ लाख रुपये विकासक मेहता यांनी आरोपी जमीन मालक गाडे, चौधरी यांना दिले होते.
हेही वाचा >>>ठाणे: आत्मपरीक्षण करण्याऐवजी आरोप करणाऱ्यांना शुभेच्छा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
व्यवहारातील रकमेतील २२ लाखाची रक्कम देऊनही सात वर्ष उलटले तरी जमीन मालक खऱेदी खत करुन देण्यास टाळाटाळ करत आहेत. आपले पैसेही ते परत नसल्याने त्यांनी आपली फसवणूक केली आहे. म्हणून विकासक मेहता यांनी याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड याप्रकरणाचा तपास करत आहेत.