वीजचोरी केल्याप्रकरणी शहापूर आणि कल्याण पश्चिम उपविभागातील प्रत्येकी दोन असे वीजचोरीचे चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात एक औद्योगिक, एक व्यावसायिक व दोन घरगुती ग्राहकांचा समावेश असून वीजचोरीची एकत्रित रक्कम २२ लाख ८६ हजार रुपये आहे.
शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील गुप्ता औद्योगिक संकुलातील सरवर एच जमशेदपुरी याच्या मालकीच्या व भाडेकरू रमेश दौलत कोतवाल याच्या औद्योगिक गाळ्यात रिमोट कंट्रोलच्या साह्याने मीटरची गती कमी करून वीजचोरी सुरू असल्याचे आढळून आले. याठिकाणी सुमारे १९ लाख ६२ हजार ९८० रुपये किमतीची १ लाख ४४ हजार ६०६ युनिट विजेचा चोरटा वापर झाल्याचे तपासात उघड झाले. तर भातसई गावातील कुक्कूट पालन व्यवसायासाठी प्रवीण हरिभाऊ जाधव यानी मीटर बायपास करून २ लाख ६६ हजार ९० रुपयांची (११ हजार ४२८ युनिट) वीजचोरी केल्याचे आढळून आले.
शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता अविनाश क्षिरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली असून क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरून मुरबाड पोलीस ठाण्यात वीजचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
कल्याण पश्चिम उपविभाग दोनमध्ये गणेश गंगाराम भोईर यानी मीटर बायपास करून ३५ हजार ३०० रुपयांची (२ हजार ५४ युनिट) तर राघो काळू भोईर यानीही मीटर बायपास करून २२ हजार ४४० रुपयांची (१ हजार २४१ युनिट) वीजचोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. सहायक अभियंता दीपाली जावळे यांच्या फिर्यादीवरून या दोन्ही घरगुती ग्राहकांविरूद्ध महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.