डोंबिवलीतील दोन अल्पवयीन मुलांनी २१ मोबाईल आणि १० सायकली चोरल्या असल्याचा प्रकार रामनगर पोलिसांनी उघडकीला आणला आहे. शहरात अल्पवयीन मुलेही सराईत चोर असल्याचे या घटनेवरुन उघड झाले आहे. चोरीच्या साहित्याची किंमत तीन लाख रुपये आहे.
दोन अल्पवयीन मुले सराईतपणे चोऱ्या करत असल्याचे तपासातून निष्पन्न झाल्याने पोलीसही बुचकळ्यात पडले आहेत. रामनगर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे साहाय्क पोलीस निरीक्षक योगेश सानप, हवालदार विशाल शंकर निवळे, वैजनाथ रावखंडे, प्रशांत सरनाईक, नितीन सांगळे शनिवारी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी दोन संशयित अल्पवयीन मुले सायकलवर बसून नांदिवली रोड येथील पराग बंगल्या समोरुन जात होती. ही मुले सायकल चालविताना मौजमस्ती करत होती. त्यांच्याकडे पाहून त्या सायकली त्यांच्या मालकीच्या नसल्याचे पोलिसांना जाणवले. त्यामुळे गस्तीवरील पोलसांनी वाहन थांबवून त्या मुलांना थांबविले. अचानक पोलीस समोर येताच मुले घाबरली. पोलिसांनी या सायकली तुमच्या आहेत का? असा प्रश्न केला. तेव्हा त्यांनी या सायकली आमच्या नसून चोरीच्या आहेत असे उत्तर दिले. यानंतर पोलिसांनी मुलाचे खिसे तपासले असात त्यात त्यांना महागडे मोबाईल आढळून आल्याने पोलीसही चक्रावले.
…मोबाईल चोरले असल्याची कबुली दिली –
पोलिसांनी दोन्ही मुलांना सायकलसह रामनगर पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्या पालकांना पोलिसांनी बोलावून घेतले. पालकांच्या उपस्थितीत पोलिसांनी दोन्ही मुलांची चौकशी केली. त्यावेळी या दोन्ही मुलांनी आयरे गाव भागातील एका घरातून आम्ही ओपो, विवो, रेडमी, पोको कंपनीचे एकूण २१ मोबाईल चोरले असल्याची कबुली दिली. आपण वापरत असलेली सायकल ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील डी मार्ट समोरुन चोरली असल्याचे सांगितले. या मुलांनी १० सायकली शहराच्या विविध भागातून सोसायटीच्या आवारातून, रस्त्यावरुन चोऱल्या आहेत.
या मुलांनी आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का याचा तपास सुरू –
चोरीचा ऐवज दोन्ही मुलांकडून जप्त करण्यात आला आहे. चोरीचे मोबाईल, सायकली यांची यादी तयार करण्यात आली आहे. रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील ज्या रहिवाशांचे मोबाईल, सायकली चोरीला गेल्या असतील त्या तक्रादारांनी चोरीला गेलेल्या वस्तुची ओळख पटवून त्या घेऊन जाण्याचे आवाहन रामगनर पोलिसांनी केले आहे. तर,सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांनी आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का याचा तपास केला जात आहे.