ठाण्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आज (रविवार) सुट्टीच्या दिवशी देखील शहराचा दौरा करून तलाव सुशोभिकरण, रस्ते आणि साफसफाई कामाची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्वच्छता कामाची पाहणी करतानाच अनधिकृत बॅनर आणि पोस्टर्स काढून टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी दिवसभरात शहरातील २२५ बेकायदा बॅनर हटविण्याची कारवाई केली.
ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा हे मागील आठवड्यापासून शहराच्या विकासकामांचा पाहणी दौरा सुरू केला असून त्यांनी आज सुट्टीच्या दिवशी पाहणी दौरा करत अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या. या दौऱ्याला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपआयुक्त अशोक बुरपल्ले, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे आणि सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. आयुक्तांनी सकाळी ७ वाजता सुरू केलेला दौरा दुपारी २ वाजता संपला.
या दौऱ्यात त्यांनी ब्रम्हांड चौक, हवाई दल स्टेशन, कापुरबावडी, माजिवडा जंक्शन, अलीग चेंबर्स, फ्लॅावर व्हॅली, तीन हात नाका सेवा रस्ता, मुलुंड चेक नाका, वागळे इस्टेट, मॅाडेल चेक नाका, वागळे इस्टेट मेन रोड, वर्तकनगर, उपवन तलाव, मासुंदा तलाव या भागांची पाहणी केली. याचबरोबर, नियमित साफसफाई, रस्ते दुभाजकांमधील झाडांची निगा व देखभाल, पदपथ मोकळे आणि साफ ठेवणे अशी कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, अनधिकृत पोस्टर्स, बॅनर, पदपथावरील टपऱ्या काढण्याची कारवाई नियमितपणे करावी अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. त्यानंतर सर्व सहायक आयुक्तांनी प्रभाग समिती क्षेत्रातील बेकायदा बॅनर काढण्याची कारवाई सुरू केली असून त्यामध्ये दिवसभरात २२५ बेकायदा बॅनर हटविण्याची कारवाई करण्यात आली.