ठाणे जिल्ह्य़ात स्वाइन फ्लूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत असल्या तरी, जिल्ह्य़ात ही साथ झपाटय़ाने वाढू लागली आहे. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्य़ात २२७ रुग्ण सापडले आहेत. यापैकी आजवर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्य़ातील एकूण रुग्णांपैकी ९९ रुग्ण ठाणे महापालिका हद्दीतील असून इतर शहरांच्या तुलनेत हा सर्वाधिक आकडा आहे. वर्तकनगर आणि घोडबंदर भागात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहेत.
ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या शहरांमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्यानंतर या आजाराचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात झाली. जिल्हा आणि महापालिका आरोग्य यंत्रणांनी या आजारापासून बचाव करण्यासाठी कशा पद्धतीने काळजी घ्यावी, यासंबंधी पत्रकाद्वारे जनजागृती सुरू केली. असे असले तरी जिल्ह्य़ात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन महिन्यांत संपूर्ण जिल्ह्य़ात २२७ स्वाइनचे रुग्ण सापडले असून त्यामध्ये ठाणे शहरातील ९९, कल्याणमधील २८, नवी मुंबई ६३, मिरारोड १२ आणि जिल्हा रुग्णालयातील १८ आदींचा समावेश आहे. त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्य़ातील २२० पैकी १३५ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.