ठाणे – विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने भारत सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरु करण्यात आली आहेत. या विद्यालयात प्रवेश मिळावा अशी प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांमधून अवघ्य़ा काही विद्यार्थ्यांना या विद्यालयात प्रवेश मिळतो. या विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी प्रवेश परिक्षा घेतली जात असून यंदाच्या वर्षी या प्रवेश परिक्षेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २३ मुलांना यश मिळाले आहे. या विद्यार्थ्यांना आता, सीबीएससीई पॅटर्न च्या धर्तीवर बारावीपर्यंत मोफत शिक्षण घेता येणार आहे.

नवोदय विद्यालय संकल्पना ही ग्रामीण भागातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी राबविण्यात येते. या विद्यालयात शिक्षण घेता यावे यासाठी दरवर्षी प्रत्येक जिल्यातून दहा हजार विद्यार्थी निवड चाचणी परीक्षा देतात. या परीक्षेतून वरच्या ८० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी प्राधान्य दिले जाते. या परिक्षेत जो विद्यार्थी उत्तम गुण प्राप्त करेल त्याला या विद्यालयात प्रवेश मिळतो. इयत्त पाचवी पास झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश परिक्षा घेतली जाते. यामध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी सहावीच्या विद्यार्थ्यांकरिता एकूण ८० जागा उपलब्ध आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागासाठी ६० तर, शहरी भागासाठी २० जागा असतात. यामध्ये ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी ३० तर, शहरी भागासाठी १० जागा आहेत.

या ग्रामीण भागातील ३० जागांपैकी २३ पात्र विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षी निवड झाली आहे. या विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सीबीएससीई पॅटर्न च्या धर्तीवर इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून निवड झालेल्या २३ विद्यार्थ्यांपैकी शहापुर तालुक्यातील २१, मुरबाड तालुक्यातील एक आणि भिवंडी तालुक्यातील एक अशा विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत ३० जागांपैकी २३ जागेवर पात्र विद्यार्थ्यांची निवड झाली आणि शहापूर तालुक्यातील २१ विद्यार्थ्यांची निवड झाली ही आनंदाची बाब आहे. या सर्व विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या आहेत.