ठाणे : भिवंडी येथील वाशिंद भागात २३ वर्षीय महिलेने तिच्या एक वर्षाच्या मुलाची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. कौटुंबिक कारणामुळे तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे चौकशीत समोर आले.
वाशिंद भागात महिला तिचा पती, मुलगा आणि सासू सोबत राहते. मंगळवारी पहाटे अचानक मुलगा घरामध्ये आढळून आला नाही. घाबरलेल्या कुटुंबाने मुलाचा सर्वत्र शोध घेतला. मुलगा हरविल्याचा बनाव महिला करू लागली. परंतु तिच्या पतीला तिच्यावर संशय आल्याने त्यांनी तिच्याकडे विचारणा केली.
हेही वाचा…चिखलोली स्थानकाच्या उभारणीला गती, मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून दोन निविदा
त्यानंतर तिने मुलाला घरावर असलेल्या पाण्याच्या टाकीत टाकल्याची कबूली दिली. या गंंभीर प्रकाराबाबत महिलेच्या पतीने पडघा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाण्याच्या टाकीतून मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबूली दिली. तिची सासू मुलावर हक्क गाजवित असे. तसेच कौटुंबिक कारणामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती दिली. या प्रकरणात महिलेविरोधात तिच्या पतीने तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी महिलेला अटक केल्याचे पडघा पोलिसांनी सांगितले.