स्मार्ट सिटीकडून ठाणेकरांच्या अपेक्षा; तब्बल अडीच लाख सुचना
केंद्र तसेच राज्य शासनाची स्मार्ट सिटी योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महापालिकेने शहरात व्यापक जनजागृती तसेच सर्वेक्षण मोहीम राबवून त्यामध्ये स्मार्ट सिटीविषयी आतापर्यंत अडीच लाख नागरिकांची मते जाणून घेतली आहेत. या योजनेंतर्गत पॅनसिटीसाठी मते नोंदवित असतानाच सुमारे ३८ टक्के नागरिकांनी २४ तास पाणी पुरवठा योजनेस प्रथम प्राधान्य दिले असून यामुळे ठाणेकरांना वाहतूकीपेक्षा पाणी समस्या अधिक भेडसावत असल्याचे या टक्केवारीतून स्पष्ट होत आहे. तसेच महिला तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेची हमी सुमारे ३५ टक्के नागरिकांनी महापालिकेकडे मागितली असून त्यासाठी महापालिका तसेच ठाणे पोलिसांनी ठोस उपाययोजना आखण्यास सुरूवात केली आहे.
ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये शुक्रवारी महापालिकेच्यावतीने स्मार्ट सिटीसंबंधी नागरिकांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. स्मार्ट सिटीबाबत नागरिकांच्या सूचना समजावून घेण्याच्या उद्देशातून हे चर्चासत्र घेण्यात आले होते. यामध्ये स्मार्ट सिटी योजनेसंबंधी माहिती देत असताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी पॅनसिटीसाठी आतापर्यंत अडीच लाख नागरिकांनी मते नोंदविल्याचे सांगितले. तसेच या सर्व मतांचे विश्लेषण करण्यात आले असून त्यामध्ये सुमारे ३८ टक्के नागरिकांनी २४ तास पाणी पुरवठा योजनेस तर ३५ टक्के नागरिकांनी महिला तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेला प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे एक खिडकी योजनेसाठी दहा टक्के, महापालिकेच्या सेवा ऑनलाईन करण्यासाठी ११ टक्के, वॉटर फ्रन्ट डेव्हलपमेंट योजनेसाठी आठ टक्के, नवीन ठाण्यासाठी १७ टक्के, ठाणे स्थानक सुधारणा प्रकल्पासाठी ३५ टक्के, गर्दीच्या ठिकाणांच्या विकासासाठी ३४ टक्के आणि इतर योजनांसाठी ४ टक्के नागरिकांनी प्राधान्य दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.
महिला तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता नागरिकांनी हमी मागितली असून त्यासाठी आम्ही कट्टीबद्ध असल्याचे ठाण्याचे सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी चर्चासत्रामध्ये बोलताना दिली. सुरक्षा व्यवस्थेसाठी शहरात सी.सी टी.व्ही कॅमेरे बसविणे आणि या कॅमेऱ्यांकरिता कमांड सेंटर असणे गरजेचे आहे. तसेच घटनास्थळी तात्काळ पोहचण्याकरिता बीट मार्शलला टॅब देण्यात येणार आहे. याशिवाय, लहान मुलांसाठी चाईल्ड प्रोटेक्शन युनिट अधिक सक्षम करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेची मदत घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाण्याबाहेरील नागरिकांचाही सहभाग
सर्वेक्षणामध्ये ३२ टक्के महिला आणि ६२ टक्के पुरुषांनी सहभाग घेतला आहे. ठाण्याबाहेरील नागरिकांनीही सहभाग घेतला आहे. त्यामध्ये २७ टक्के विद्यार्थ्यांचा तर १४ टक्के ठाण्याबाहेरील नागरिकांचा सहभाग आहे.

Story img Loader