डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील बँक ऑफ बडोदा शाखेच्या एटीएम केंद्रात एका ग्राहकाची भामट्याने एटीएम कार्डची अदलाबदल केली. अदलाबदल करत असताना ग्राहकाला बोलण्यात गुंतवून ग्राहकाच्या बँक खात्यामधील रकमेतील २५ हजार रुपये एटीएमच्या माध्यमातून काढून फसवणूक केली आहे.
मोहम्मद खान (२८, रा. तुळसी गार्डन, खंडोबानगर, गणेशनगर, डोंबिवली) असे तक्रारदाराचे नाव आहे. मोहम्मद खान हे काही दिवसापूर्वी त्यांच्या पत्नीचे बडोदा बँकेचे एटीएम कार्ड घेऊन एटीएम केंद्रातून पैसे काढण्यासाठी देवी चौकातील बँकेच्या एटीएम केंद्रात गेले होते. एटीएम केंद्रात प्रवेश करताच एक इसम त्यांच्या पाठोपाठ एटीएम केंद्रात गेला. त्याने मोहम्मद खान यांना बोलण्यात गुंतवले. आणि एटीएम, बँक खाते विषयावर बोलून तांत्रिक कारणे उपस्थित करुन मोहम्मद यांच्या हातामधील त्यांच्या पत्नीचे एटीएम कार्ड इसमाने स्वताकडे घेतले.
हेही वाचा >>> ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानालगतच्या इमारतीतील १३ वर्षीय मुलीची आत्महत्या
त्याचे बंद एटीएम कार्ड त्याने मोहम्मद यांच्या ताब्यात दिले. भामट्याने केलेली अदलाबदल मोहम्मद यांच्या निदर्शनास आली नाही. त्यानंतर भामट्याने मोहम्मद यांच्या पत्नीच्या बँक खात्यामधून २५ हजार रुपये काढून घेऊन मोहम्मद यांची फसवणूक केली. एटीएम केंद्रात आलेल्या भामट्याने आपली फसवणूक केल्याचे मोहम्मद यांच्या उशिरा निदर्शनास आले. विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी मोहम्मद यांनी फसवणूक प्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.