राज्य शासनाचे आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी शहापूर ते मंत्रालया असा पदयात्रा मोर्चा बुधवार पासून काढला आहे. हा मोर्चा गुरुवारी दुपारच्या सुमारास भिवंडीत पोहोचला असता, त्यातील २५ ते ३० महिलांना उष्मघाताचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे. या महिलांवर भिवंडीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हेही वाचा >>> ठाणे : नमो सेंट्रल पार्कचे प्रवेश शुल्क दर जाहीर
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत, सुमारे ८४ हजार आशा स्वयंसेविका आणि ४ हजार गटप्रवर्तक कर्मचारी २००५ सालापासून काम करत आहेत. आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक ग्रामीण आदिवासी तसेच महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याबाबत सेवा देण्याचे महत्वाचे काम करतात. १ नोव्हेंबर २०२३ रोजी, आरोग्य मंत्र्यांनी गटप्रवर्तकांना १० हजार रुपये, आश स्वयंसेविकांना ७ हजार आणि २ हजार रुपये दिवाळी भाऊबीज भेट देण्याचे जाहीर केले होते. तसेच त्याबाबतचे शासकीय आदेश विनाविलंब काढण्याचे आश्वासन दिले होते.
हेही वाचा >>> Kalyan Crime: कल्याणमध्ये विद्यार्थ्याला बेदम मारहाण
परंतु, तीन महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा मानधनवाढीचा शासकीय आदेश अद्याप निर्गमित करण्यात आलेला नाही. यासाठी राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी १२ जानेवारी पासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला तीन आठवडे होऊन सुद्धा राज्य शासनाने आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या संपाची दखल घेतलेली नाही. परिणामी, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांनी व गटप्रवर्तकांनी शहापूर ते मंत्रालयपर्यंत पदयात्रा मोर्चा बुधवार पासून काढला आहे. या मोर्चात ५०० ते ६०० आशास्वयंसेविका सहभागी झाल्या आहेत. हा मोर्चा गुरुवारी दुपारी भिवंडीत आला असता, मोर्चामधील २५ ते ३० महिलांना उष्मघाताचा त्रास झाल्याचे समोर आले. या महिलांना भिवंडीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व अशा स्वयंसेविका संघा मार्फत देण्यात आली.
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या समोर प्रश्नांचे गाऱ्हाणे मांडणार आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा हा पदयात्रा मोर्चा शुक्रवार (आज) दुपारी १ वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे. यावेळी मोर्चामध्ये सहभागी असलेले आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार असून आपले प्रश्न त्यांच्या समोर मांडणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व अशा स्वयंसेविका संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.