ठाणे : अझरबैजान या देशात नोकरीला लावून देतो असे सांगून मुंबई, ठाण्यातील २५ हून अधिक तरुणांची २२ लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोनजणांविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
कापूरबावडी येथील एका माॅलमध्ये दोन जणांनी जीएमएमएस वेंचर प्रा. लि. नावाने कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून परदेशात नोकरी मिळवून दिली जाते, अशी जाहिरात एका ॲपवर आली होती. त्यामुळे अनेक तरुणांनी या कंपनीत प्रत्यक्ष भेट दिली होती. त्यांनी अझरबैजान या देशात नोकरी मिळवून देतो, असे सांगितले होते. तसेच, सुमारे एक लाख रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाईल, असेही सांगितले. त्यामुळे, अनेक तरुण या बतावणीस बळी पडले.
नोकरीच्या बदल्यात कंपनीतील अधिकाऱ्यांनी तरुणांकडून टप्प्याटप्य्याने हजारो रुपये वसूल केले होते. परंतु, त्यांना नोकरी मिळाली नव्हती. त्यानंतर काही तरुणांनी कंपनीत प्रत्यक्ष भेट दिली असता तिला टाळे ठोकले असल्याचे समोर आले. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याआधारे, २५ तरुणांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.