लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : पावसाळा सुरू होण्याच्या चार महिने आधीपासूनच ठाणे महापालिकेने विशेष खबरदारी घेत शहरातील धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी पाऊले उचलली असून यासाठी शहरातील ९६ अतिधोकादायकपैकी नागरिक राहत असलेल्या २६ अतिधोकादायक इमारतींना पालिकेने नोटीस बजावण्यास सुरूवात केली आहे. या नोटीसद्वारे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून इमारत रिकामी करण्याची सुचना केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्याच्या कालावधीत बेकायदा इमारती कोसळून जिवितहानी होण्याचे प्रकार घडले आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी पालिकेने जुन्या इमारतींना बांधकाम संरचनात्मक परिक्षण करण्याची सुचना केली होती आणि त्यासाठी संबंधित कंपन्यांची यादीही पालिकेने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. या अहवालानुसार पालिकेकडून शहरातील धोकायदायक इमारतींची पालिकेकडून सी-१, सी-२ ए , सी २ बी आणि सी ३ अशा चार टप्प्यांत वर्गीकरण करण्यात येते. यानुसार संपुर्ण पालिका क्षेत्रात ४ हजार ४०७ धोकादायक इमारती असून त्यात ९६ अतिधोकादायक इमारती आहेत.
सर्वाधिक ४७ अतिधोकादायक इमारती नौपाडा परिसरात आहेत तर, त्याखालोखाल १६ अतिधोकादायक इमारती कोपरी परिसरात आहेत. यामुळे या दोन्ही विभागातच ६३ अतिधोकादायक इमारती आहेत. या इमारती पावसाळ्यात कोसळून जिवितहानी होण्याची शक्यता असते. यामुळे या इमारती पालिकेकडून रिकाम्या करून त्यांचे बांधकाम निष्काषित केले जाते. परंतु काही ठिकाणी रहिवाशी इमारत रिकामी करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे अशा रहिवाशांना पालिका पावसाळ्याच्या पंधरा दिवस आधी नोटीस बजावून इमारत रिकामी करण्याची सुचना देते. यंदा मात्र पालिकेने चार महिने आधीपासूनच अशा इमारतींना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ९६ अतिधोकादायक इमारती आहेत. त्यापैकी ३६ इमारती रिकाम्या करण्यात पालिकेला यश आलेले आहे. याव्यतिरिक्त १४ इमारतींची बांधकामे पालिकेने तोडली आहेत. तर, १० इमारतींची बांधकामे तोडणे बाकी आहे. ७ बांधकामे बैठ्या घरांच्या स्वरुपाची आहेत. ३ प्रकरणात दोन बांधकाम संरचनात्मक अहवाल भिन्न आले आहेत. तर, २६ इमारतीत आजही रहिवाशी राहत आहेत. या एकूण ९६ अतिधोकादायक इमारतींमध्ये ५४६ कुटूंबाची घरे तर, १५१ जणांची दुकाने आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचे सी-१, सी-२ ए, सी-२बी आणि सी-३ अशा चार टप्प्यांत वर्गीकरण केले आहे. सी-१ म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तात्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत, सी-२ ए म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे, सी-२ बी म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे आणि सी-३ म्हणजे इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणे. त्यामुळे सी-२ बी आणि सी-३ च्या यादीत ४ हजार १९ धोकादायक इमारती असल्या तरी त्याठिकाणी रहिवास वापर सुरूच राहणार आहे.
प्रभाग समिती | सी १ | सी २ ए | सी २ बी | सी ३ | एकूण |
नौपाडा,कोपरी | ६३ | २१ | ३०७ | ५९ | ४५० |
वागळे | ०० | ०२ | १०८८ | ०७ | १०९७ |
लोकमान्यनगर | ०६ | १५ | १९९ | ०४ | २२४ |
वर्तकनगर | ०० | २३ | ३० | ०९ | ६२ |
माजिवडा | ०९ | १३ | १२३ | ३७ | १५७ |
उथळसर | ०८ | ०८ | ११४ | ३७ | १६७ |
कळवा | ०६ | १४ | १७३ | ५३ | २४६ |
मुंब्रा | ०४ | १०९ | ३७५ | ८५५ | १३४३ |
दिवा | ०० | ०१ | ७७ | ५८३ | ६६१ |
एकूण | ९६ | २०६ | २४८६ | १६१९ | ४४०७ |