भविष्यासाठी काढलेला विमा बंद करताना घेतलेली मदत उल्हासनगरातील महिलेला महागात पडली आहे. दोन भामट्यांनी विनासायास विमा बंद करून देतो असे सांगत या महिलेला तब्बल २६ लाख ६६ हजार रूपये घेत गंडा घातला आहे. आपली फसवणूक झाल्याचे कळताच या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर मनिष अग्रवाल आणि मनोज शर्मा या दोघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> रामदास कदम यांना गद्दार म्हणत शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन

उल्हासनगरच्या कॅम्प चार भागात राहणाऱ्या ५८ वर्षीय सेवानिवृत्त महिलेने इंडियाफस्ट लाईफ लॉंग गॅरेंटेड इन्कम प्लान पॉलिसी व एचडीएफसी कंपनीचा विमा काढला होता. तो विमा बंद करून त्याचे पैसे मिळवण्यासाठी या महिलेने प्रयत्न सुरू केले होते. यासंबंधात या महिलेला आरोपी मनिष अग्रवाल आणि मनोज शर्मा यांनी फोन करून आपण भारतीय विमा नियमन आणि विकास प्राधिकरणाच्या दिलीतील कार्यालयाचे कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करून त्यांना विमा विनासायास बंद करून त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून ऑनलाईऩ पद्धतीने २६ लाख ६६ हजार १३७ रूपये घेतले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे कळताच या महिलेने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी मनिष अग्रवाल आणि मनोज शुक्ला या दोघांविरूद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader