ठाणे : जिल्ह्यात आरटीई अंतर्गत २५ टक्के जागांसाठी होणाऱ्या मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रतिक्षा यादी क्रमांक १ मधील २ हजार ७०५ विद्यार्थ्यांची निवड मंगळवारी करण्यात आली. या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना निवड झाल्याचा संदेश त्यांच्या दुरध्वनी क्रमांकावर पाठविण्यात आला असून पालकांनी संदेश पाहून कागद पत्रांच्या पडताळणीसाठी जवळच्या केंद्रावर जाण्याचे आवाहन शिक्षण अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. कागद पडताळणीसाठी २४ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ साठी १४ जानेवारीपासून सुरुवात झाली. ठाणे जिल्ह्यातील ६२७ शाळांमधील ११ हजार ३२२ जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. १४ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील २५ हजार ७७४ विद्यार्थ्यांचे आरटीई प्रवेशासाठी अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १० हजार ४२९ विद्यार्थ्यांची आरटीई प्रवेशासाठी निवड झाली. या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २८ फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू, ठाणे जिल्ह्यात २८ फेब्रुवारीपर्यंत केवळ ५ हजार ११३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. आरटीई प्रवेशासाठी निवड झाल्या संदर्भात आणि प्रवेश निश्चित करण्याची माहिती पालकांना दुरध्वनी संदेशाद्वारे दिली जाते. या संदेशाकडे पालकांचे दुर्लक्ष होत असून त्यामुळेच अद्याप काही विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले नाही असा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला होता. त्यामुळे पालकांना प्रवेशासाठी आणखी वेळ मिळावा याकरिता प्रवेश घेण्याची तारिख १० मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती. यासंदर्भातील, माहिती आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली होती. त्यानुसार, निवड झालेल्या १० हजार ४२९ विद्यार्थ्यांपैकी केवळ ६ हजार ७२१ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले.
निवड झालेलेल्या काही विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे त्यांचे अर्ज बाद करण्यात आले. तरीही, ४ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देणार की, प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची या जागेसाठी निवड केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी पहिली प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली. त्यात, ठाणे जिल्ह्यातील २ हजार ७०५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या संदर्भातील संदेश विद्यार्थ्यांच्या पालकांच्या दुरध्वनी क्रमांकावर पाठविण्यात आला आहे. त्यामुळे पालकांनी हा संदेश पाहून लवकरात लवकर त्यांना दिलेल्या केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करुन घ्यावी असे आवाहन शिक्षण अधिकाऱ्यांनी केले आहे.
शिक्षणअधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन…
पालकांनी केवळ दुरध्वनी संदेश (एसएमएस) वर अवलंबून राहू नये. आरटीई संकेतस्थळावरील ‘अर्जाची स्थिती’ या टॅबवर आपल्या बालकांचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी, तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे. प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी अलोटमेंट लेटर आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत नजिकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून २४ मार्चपर्यंत कागदपत्रांची तपासणी करून आपल्या बालकांचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन ठाणे जिल्हा प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.