कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत मागील सहा वर्षांपासून सुरू असलेली २९७ कोटींची मलनिस्सारणाची कामे भूसंपादनाच्या कचाट्यात अडकली आहेत. ही कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश नगरविकास विभागाने पालिका प्रशासनाला दिले होते. अन्यथा आयुक्तांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव डाॅ. सोनिया सेठी यांनी दोन महिन्यांपूर्वी पालिका प्रशासनाला दिला होता.
नगरविकास विभागाने इशारा देताच पालिकेने ही कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचा अहवाल शासनाला पाठविला होता. आता हाती घेतलेली बहुतांशी कामे भूसंपादनाच्या कचाट्यात अडकली असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. ही कामे रेंगाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र शासनाच्या अमृत अभियान टप्पा एक, दोनमधून ही कामे पाच ते सहा वर्षांपूर्वी हाती घेण्यात आली आहेत. सहा वर्षांपासून कामे सुरू असताना भूसंपादनाच्या प्रक्रिया नगररचना विभागातील जबाबदार नगररचनाकारांनी का पार पाडली नाही, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. इमारत बांधकाम आराखड्यांमध्ये व्यस्त या नगररचनाकारवर आता काय कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – डोंबिवलीतील डाॅमिनोज पिझ्झामध्ये नोकरानेच केली चोरी
योजनेचे स्वरूप
या योजनांमुळे सोसायट्यांच्या मलवाहिन्या पालिकेच्या मुख्य मलवाहिनीला जोडण्याची कामे केली जात आहेत. या कामांतर्गत ११ मल उदंचन केंद्रे, ४७ किमी लांबीच्या मलवाहिन्या आणि रायझिंग मेन टाकण्यात आल्या आहेत. मागील पाच वर्षांच्या काळात ३० हजार मिळकती मुख्य मलवाहिनीस जोडण्याची कामे पूर्ण करण्यात आली आहेत, असे अमृत योजनेचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी सांगितले. पालिकेच्या सेक्टर १२ मधील योजनेला २०१७ मध्ये मंजुरी मिळाली होती. या टप्प्यातील कामांसाठी शासनाने १६५ कोटी प्रस्तावित केले आहेत. या योजनेवर आतापर्यंत १४५ कोटी खर्च झाला आहे. या प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवलीतील जुनी डोंबिवली, मोठागाव, टिटवाळा, वाडेघर, कचोरे, लोकग्राम, कोळीवली, उंबर्डे, ठाकुरवाडी भागातील नागरिकांना आपल्या सोसायटीची मल जलवाहिनी पालिकेच्या मुख्य मलवाहिनीला जोडणे शक्य होणार आहे.
शहाड ते टिटवाळा भागात नाले अडवून मलनिस्सारणाची व्यवस्था राबविण्याचे काम २०१८ मध्ये हाती घेण्यात आले आहे. हे कामे १३२ कोटींचे आहे. शहाड ते टिटवाळा भागातील अनेक सोसायट्यांचे मलपाणी प्रक्रिया न करता थेट उल्हास खाडीत वाहून जाते. मोहने, संतोषीमाता नगर, जी. के. पेपर मील, नेपच्युन भागातील नाले अडवून हे पाणी आंबिवली येथील मल प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करून मग खाडीत सोडण्याचे नियोजन आहे. वाडेघर येथे २६ दशलक्ष लीटर, आंबिवली येथे २१ दशलक्ष लीटर, मोठागाव येथे ४० दशलक्ष लीटर क्षमतेची मल प्रक्रिया केंद्रे प्रस्तावित आहेत. वाडेघर, आंबिवलीतील मल केंद्रे सुरू आहेत. डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा येथे १५ वर्षांपूर्वी मलप्रक्रिया केंद्राचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम रखडून प्रकल्पाला गंज पकडला आहे.
हेही वाचा – डोंबिवली पूर्व भाजपा मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा
“अमृत योजनेतील ९८ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणी १५ ते ३० मीटर अंतराचे भूसंपादन रखडले आहे. भूसंपादन झाले की हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत होतील.” – घनश्याम नवांगुळ, कार्यकारी अभियंता, मलनिस्सारण प्रकल्प.