ठाणे, कल्याण : नववर्ष स्वागत आणि पूर्वसंध्येला मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या २९७ जणांविरोधात ठाणे पोलिसांनी कारवाई केली आहे. सर्वाधिक कारवाई भिवंडी आणि ठाणे शहरात करण्यात आली. तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २९९ वाहन चालकांना दंड आकारण्यात आला आहे. मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात न्यायालयात खटले दाखल होणार असल्याचे उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी स्पष्ट केले.
सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जमणाऱ्या जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणे पोलिसांकडून दररोज गस्ती आणि चोख बंदोबस्त ठेवला जात होता. असे असले तरी पार्टीनिमित्ताने जाणारे अनेकजण मद्य पिऊन वाहन चालवित असतात. अशा मद्यपी वाहन चालकांमुळे अपघात घडत असतात. हे प्रकार टाळण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात ८० ठिकाणी ३६ अधिकारी आणि २६४ कर्मचाऱ्यांच्या पथकांनी नाकाबंदी केली होती. ३१ डिसेंबरच्या रात्री आणि १ जानेवारीच्या दिवशी पहाटे पर्यंत कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण २९७ वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात आली.
हेही वाचा >>> डोंबिवलीत कुंभारखाणपाडा येथे खारफुटीच्या जुनाट झाडांची कत्तल; तोडलेल्या झाडांच्या जागेवर आठ माळ्याची बेकायदा इमारत
सर्वाधिक कारवाई भिवंडी, ठाणे शहरात करण्यात आली. ठाणे ते दिवा या क्षेत्रात ९० मद्यपींवर कारवाई झाली. यामध्ये घोडबंदर भागात ३२ आणि वागळे इस्टेटमध्ये १६ मद्यपी वाहन चालकांचा सामावेश आहे. तर भिवंडी शहरात ९४ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई झाली. यातील सर्वाधिक कारवाई कशेळी, काल्हेर, नारपोली भागात झाली. येथील ५७ मद्यपी वाहन चालकांवर झाली.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरूणाची अकरा लाखाची फसवणूक
डोंबिवली, कल्याण भागातही ६४ मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात आली. डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे, कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचीन सांडभोर आणि कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. तर उल्हासनगर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात ४९ मद्यपींवर कारवाई करण्यात आली.
१७ हजार वाहन चालकांवर कारवाई
ठाणे वाहतुक पोलिसांनी २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबविली होती. या दिवसांतही पोलिसांनी कारवाई केली. या कालावधीत मद्य पिऊन वाहने चालविणाऱ्या एकूण ४४६ वाहन चालकांविरोधात कारवाई झाली आहे. तर वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ हजार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये दुचाकीवर तीनजणांनी प्रवास करणे, सिग्नल नियमांचे उल्लंघन करणे यांसारख्या कारवाईचा सामावेश आहे.