कल्याण- कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, विक्रोळी परिसरात घरफोड्या करणाऱ्या तीन जणांना येथील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. एका फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. अटक आरोपींकडून पोलिसांनी रोख रक्कम, सोन्या, चांदीचा ऐवज असा एकूण आठ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
साकीर जाकीर खान (२०, रा. म्हारळ गाव, कल्याण), मोहम्मद करीम उर्फ लाडो अख्तरखाली बागवान (२०, रा. मच्छी मार्केट, खेमाणी, उल्हासनगर ३), शिवम महेंद्र बतमा उर्फ मच्छी (२०, रा. जावसईगाव, अंबरनाथ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. फरार शंकर उर्फ अक्षय विष्णु पडघने याचा पोलीस तपास करत आहेत.
महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, साहाय्यक निरीक्षक दीपक सरोदे, देविदास ढोले यांच्या पथकाने ही अटकेची कारवाई केली.
हेही वाचा >>> डोंबिवलीत मंजुनाथ शाळेजवळ दोन महिलांना तीन भामट्यांनी लुबाडले
पोलिसांनी सांगितले, कल्याण पश्चिमेतील चिकणघर येथील छत्री बंगल्या जवळील मोरया स्वीट्स आणि ड्रायफ्रुटचे दुकान फोडून चोरट्यांनी ३२ हजाराचे किमती साहित्य, सामान चोरुन नेले होते. फेब्रुवारी मध्ये ही चोरी झाली होती. या चोरीचा तपास करताना पोलिसांनी दुकान परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि त्यात दिसणारे इसम पाहून सुरू केला होता. चित्रीकरणात दिसणारे इसम यांचा कोणताहा माग पोलिसांना लागत नव्हता. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी मोरया स्वीट्समधील आरोपीची ओळख पटविण्यात यश आले. त्याला शिताफिने अटक केली. मोहमद करीन बागवान असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडूुन पोलिसांनी चोरीतील सात हजार रुपये जप्त केले. मोहम्मच्या माहितीवरुन पोलिसांनी त्याचा साथीदार साकीर खान याला अटक केली. त्याच्याकडून पाच हजार रुपये जप्त केले आहेत.
साकीरच्या चौकशीतून पोलिसांना धक्कादायक मिळाली. साकीर, त्याचे साथीदार शिवम मच्छी, शंकर पडघने महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीत एकूण सात घरफोड्या केल्याची कबुली साकीरने पोलिसांना दिली. या सातही घरफोडी प्रकरणातील एकूण सात लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये १५ तोळे सोन्याचे दागिने, कानातील कुडी, मंगळसूत्र, लामणदिवा, चांदीचे पेले, वाट्या, पैंजणचा समावेश आहे.
या आरोपींनी बदलापूर, अंबरनाथ, विक्रोळी, उल्हासनगर मध्यवर्ति पोलीस ठाणे हद्दीत एकूण नऊ गुन्हे केले आहेत. अनेक चोऱ्या या आरोपींच्या अटकेने उघड होतील, असे होनमाने यांनी सांगितले. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस उपनिरीक्षक संजय जगताप, विजय भालेराव, हवालदार शशिकांत निकाळे, मनोहर चित्ते, सतीश सोनावणे, काशिनाथ जाधव, भगवान भोईर, सुमित मधाळे, सचिन भालेराव, रामेश्वर गामणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.