ठाणे : निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने ठाणे पोलिसांनी परवानाधारक अग्निशस्त्र जप्त करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ४ हजार ४५७ परवानाधारक अग्निशस्त्र आहेत. त्यापैकी ३ हजार ७४८ अग्निशस्त्र पोलिसांनी जप्त केले आहेत. काही महिन्यांपूर्वी आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर परवानाधारक अग्निशस्त्राने गोळीबार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी परवानाधारक अग्निशस्त्राविषयी सावधगिरीची पावले उचलली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ येतो. या मतदारसंघातील बहुतांश भाग ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतो. ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहराचा भाग येतो. तर या लोकसभा मतदारसंघांचा उर्वरित भाग ठाणे ग्रामीण, मिरा भाईंदर आणि नवी मुंबई क्षेत्रात येतो. निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत शस्त्र परवानाधारकांनी शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करणे बंधनकारक असते. निवडणुकीच्या वेळी अग्निशस्त्रांचा वापर करता येत नाही. अग्निशस्त्र वापरणाऱ्यांकडून मतदारांवर प्रभाव पाडणे, धमकावणे किंवा मतदारांना एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान करण्यास भाग पाडण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तसेच निवडणुका निष्पक्ष पार पाडल्या जाव्यात म्हणून पोलिसांकडून ही अग्निशस्त्रे जप्त केली जातात.

हेही वाचा – ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम. के. मढवी यांना जामीन

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात एकूण ४ हजार ४५७ परवानाधारक अग्निशस्त्र आहेत. त्यापैकी ३ हजार ७४८ अग्निशस्त्र जप्त करण्यात आली आहेत. असे असले तरी सुरक्षेच्या कारणास्तव काही जणांना त्यातून वगळण्यात आले आहे. तर काहींना सुरक्षेच्या कारणास्तव शस्त्र बाळगण्याची सक्ती आहे. बँक सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा संस्थांचे सशस्त्र कर्मचारी, कर्तव्यावर असलेले सरकारी कर्मचारी आणि अंगरक्षक यांच्या सक्तीमुळे शस्त्रे ठेवण्यास सूट देण्यात येते.

उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या बंदुकीने शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. यात महेश गायकवाड बचावले असले तरी या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यामुळे ठाणे पोलिसांनी शस्त्र वापरकर्त्यांवर लक्ष ठेवले आहे.

हेही वाचा – उबाठाचे २०१९ मध्ये काँग्रेसीकरण झाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

आयुक्तालय क्षेत्रातील जप्त अग्निशस्त्र (लोकसभा मतदारसंघानुसार)

ठाणे – १ हजार १०१

कल्याण – १ हजार ६९८

भिवंडी – ९४९

एकूण – ३,७४८

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 thousand 748 licensed firearms seized in thane commissionerate area ssb