कल्याण – वाढीव व्याजाचे आमिष दाखवून कल्याणमधील एका गुंतवणूक एजन्सी चालविणाऱ्या संस्थेच्या संचालकांनी एका विकासकासह एका महिलेची ३० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. मागील वर्षभराच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
विशांत विश्वास भोईर, पूजा विशांत भोईर (रा. श्री गणेश माधव सोसायटी, खडकपाडा, कल्याण) अशी फसवणूक करणाऱ्या संचालकांची नावे आहेत. भोईर दाम्पत्याची मे. साई ॲड्व्हायझरी ॲन्ड इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. पोलिसांनी सांगितले, आरोपी विशांत आणि पूजा यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तक्रारदार सौरभ गणात्रा (३९, रा. सुंदरनगर, बेतुरकरपाडा) आणि यशश्री साळुंखे यांना आपण शेअर व्यवसायात काम करतो. आमच्या गुंतवणूक कंपनीत आपण पैसे गुंतविले तर आपणास १० टक्के परतावा मिळेल असे वाढीव नफ्याचे आमिष दाखविले. वाढीव नफा मिळतो म्हणून बांधकाम व्यावसायिक सौरभ यांनी २५ लाख, आणि यशश्री यांनी पाच लाख रुपये भोईर यांच्या मे. साई इन्व्हेस्टमेंट कंपनीत गुंतविले.
वर्ष होत आले तरी आपणास व्याज मिळत नसल्याने तक्रारदाराने मूळ रक्कम परत करण्याची मागणी भोईर यांच्याकडे केली. ती रक्कमही देण्यास ते टाळाटाळ करू लागले. भोईर आपली फसवणूक करत असल्याची खात्री पटल्यावर सौरभ गणात्रा यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.