लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेच्या १० प्रभागांमधील कचरा संकलन केंद्रावर नागरिकांनी मे ते जून या कालावधीत तीन हजार किलो विविध प्रकारचा टाकाऊ पण पुनर्वापर करता येणारा कचरा जमा केला. वस्तू रुपातील या टाकाऊ कचऱ्यात दोन हजार विविध प्रकारच्या वस्तू आहेत.
मे ते जून या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे केंद्र शासनाच्या आदेशावरुन ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ अभियान राबविले होते. कचऱ्याची पूर्ण विल्हेवाट, कचऱ्याचा पुनर्वापर आणि प्रक्रिया करुन कचऱ्याची विल्हेवाट अशा तीन स्तरावर या कचऱ्याचे संकलन घनकचरा विभागातर्फे करण्यात आले.
हेही वाचा… अंबरनाथमध्ये कंपनीला भीषण आग सुदैवाने जीवितहानी टळली
घरातील फर्निचर, टाकाऊ चप्पल, कपडे, साड्या, वह्या, पुस्तके, प्लास्टिक वस्तू रहिवाशांकडून कचऱ्यात टाकले जातात. हा कचरा दररोजच्या कचऱ्यात येऊ नये. हा कचरा कचराभूमीवर न येता त्याची स्थानिक पातळीवर कशी विल्हेवाट लावता येईल, यादृष्टीने आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी नियोजन केले होते.
हेही वाचा… ठाण्यात अपंग चहा स्टाॅल वाटपात घोटाळा? मर्जीतील आणि राजकीय वरदहस्त असलेल्यांचा लाभार्थी यादीत समावेश
कचरा संकलन केंद्रावर वापर करता येण्यासाऱखे सामान सोलास इंडिया संस्थेच्या रुपिंदर कौर यांच्यामार्फत आदिवासी, दुर्गम भागातील गरजू रहिवाशांना वाटप केले जाणार आहे. १० प्रभाग हद्दीतील कचरा संकलन केंद्रांना मिळालेला प्रतिसाद पाहून आयुक्तांनी कल्याण, डोंबिवलीत दोन कचरा संकलन केंद्रे कायमस्वरुपी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.