केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत पर्यावरणपुरक विजेवरील बसगाड्यांच्या खरेदीसाठी उपलब्ध झालेल्या निधीतून १२३ बसगाड्या ठाणे परिवहन उपक्रमाने खरेदी केल्या असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात उपलब्ध झालेल्या ११ बसगाड्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच, ९ फेब्रुवारीला लोकार्पण करण्याची तयारी परिवहन प्रशासनाने सुरू केली आहे. त्याचबरोबर, नव्याने खरेदी करण्यात आलेल्या सीएनजी इंधनावरील २० बसगाड्यांचे लोकार्पणही याच दिवशी करण्याचे नियोजन आखण्यात येत आहे. यामुळे पुढील महिन्यापासून ठाणेकरांना प्रवासासाठी ३१ नवीन बसगाड्या उपलब्ध होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण ३६४ बसगाड्या आहेत. त्यापैकी उपक्रमाच्या स्वत:च्या १२४ बसगाड्या आहेत. तर, उर्वरित २२० बसगाड्या ठेकेदारामार्फत जीजीसी तत्वावर चालविण्यात येत आहेत. एकूण ३६४ पैकी ३०० बसगाड्या प्रत्यक्षात प्रवासी सुविधेसाठी चालविण्यात येत आहेत. प्रवाशी संख्येच्या तुलनेत या बसगाड्यांची संख्या अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने परिवहनच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याचाच एक भाग म्हणून मध्यंतरी परिवहन उपक्रमाला १५३ भंगार बसगाड्यांच्या विक्रीतून प्राप्त झालेल्या ५ कोटी ८२ लाखांच्या निधीतून २५ सीएनजीवरील बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यापैकी २० सीएनजी बसगाड्या परिवहन उपक्रमाला उपलब्ध झाल्या आहेत. त्याचबरोबर, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत विजेवरील बसगाड्यांच्या खरेदीसाठी उपलब्ध झालेल्या ५८ कोटींच्या निधीतून जीसीसी तत्वावर १२३ बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय ठाणे परिवहन प्रशासनाने घेतला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ११ बसगाड्या परिवहन प्रशासनाला उपलब्ध झाल्या आहेत. या सर्वच ३१ बसगाड्यांची ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नोंदणी करण्याची प्रकिया सुरू करण्यात आली असून, ही प्रक्रीया लवकरच उरकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसांच्या दिवशी म्हणजेच, ९ फेब्रुवारीला सर्वच बसगाड्यांचे लोकार्पण करण्याची तयारी परिवहन प्रशासनाने सुरु केली आहे.
हेही वाचा – डोंबिवलीत कोपरमध्ये शाळेच्या आरक्षणावर ‘रेरा’ घोटाळ्यातील बेकायदा इमारत
उर्वरित विजेवरील बसगाड्या जून महिनाअखेरपर्यंत टिएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बसगाड्या शहरातील सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या डिझेल बसच्या मार्गिकेवर चालविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यापूर्वीच दिले असून, त्यानुसार परिवहन प्रशासनाकडून बसगाड्यांच्या मार्गाचेही नियोजन करण्यात येत आहे.
ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात ११ वीजेवरील, तर २० सीएनजीवरील बसगाड्या दाखल झाल्या आहेत. या सर्वच ३१ बसगाड्यांची ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नोंदणी करण्याची प्रकीया सुरू करण्यात आली आहे. या बसगाड्यांचे ९ फेब्रुवारीला लोकार्पण करण्यात येणार आहे, असे ठाणे परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे म्हणाले.