लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण : महावितरणच्या कल्याण परिमंडळात गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत ३३ लाख सामान्य, लघुदाब वीज ग्राहकांनी एकूण ७३६ कोटी ५२ लाख रूपयांचा वीज देयक भरणा महावितरणकडे केला आहे. हा सर्व वीज भरणा वीज ग्राहकांनी ऑनलाईन पध्दतीने भरणा केला आहे.

वीज ग्राहकांना वीज देयक भरण्यासाठी उपयोजन, नेटबँकिंग, आरटीजीएस अशी अनेक ऑनलाईन साधने महावितरणने उपलब्ध करून दिली आहेत. या साधनांच्या साहाय्याने ग्राहकांनी हा वीज भरणा केला आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले. कल्याण परिमंडळात जानेवारीमध्ये २० लाख ९८८ लघुदाब वीज ग्राहकांनी ४५६ कोटी २२ लाख रुपयांची वीज देयके ऑनलाईन माध्यमातून भरणा केली. २० फेब्रुवारीपर्यंत १३ लाख २२ हजार ६०६ ग्राहकांनी २८० कोटी ३० लाख रूपयांचा वीज देयक भरणा ऑनलाईन माध्यमातून भरला आहे.

वीज ग्राहक महावितरणच्या डिजिटल पध्दतीचा वीज देयक भरणा करण्यासाठी वापर करत असल्याने वीज ग्राहकांचे वीज देयक भरणा केंद्रासमोर उभे राहण्याचे कष्ट वाचले आहेत. ऑनलाईन देयक भरणा केल्याने वीज ग्राहकांना वीज देयकात पाव टक्का सवलतही मिळत आहे.

जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा अधिक वीज देयके ऑनलाईन माध्यमातून भरणाऱ्या ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी सोडत पध्दतीने स्मार्टफोन, स्मार्टवाॅच अशी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी महावितरणच्या उपविभाग स्तरावर वीज ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यात प्रत्येक महिन्यात एकदा सोडत काढली जाणार आहे. प्रत्येक सोडतीमध्ये पाच विजेत्यांना स्मार्टफोन, स्मार्टवॉच जिंकण्याची संधी विजेत्यांना प्राप्त होणार आहे.

सावध राहा

अनोळखी क्रमांकावरून महावितरणचे वीज देयक भरणा करा, असा लघुसंदेश आपल्या मोबाईल, व्हॉट्सपवर आल्यास त्यापासून सावध राहण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. तुम्ही वीज देयक भरणा केलेले नाही. तुमच्या घराचा वीज पुरवठा तात्काळ खंडित केला जाणार आहे, अशी माहिती देऊन काही सायबर भुरटे वीज ग्राहकांची फसवणूक करतात. वीज ग्राहकांना तात्काळ वीज देयक भरणा करण्यास सांगून, त्यांची बँक खाते व इतर माहिती ताब्यात घेऊन त्या माध्यमातून सायबर आर्थिक घोटाळा करतात. महावितरण थकबाकीदार वीज ग्राहकाला पूर्वसूचना देऊन, त्याला रितसर नोटीस देऊन मगच वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करते. त्यामुळे कोणी कितीही वीज देयक भरणा करा, आपल्या घराचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे, असे संपर्क करून सांगितले तरी त्याच्यावर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन महावितरणने केले आहे.