ठाणे : प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे रेल्वे स्थानकात फलाटांवर लावण्यात आलेल्या १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी ३४ कॅमेरे गेले अनेक आठवडे बंद असल्याची बाब उघडकीस आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या भागात कोणतीही दुर्घटना, अपघात वा गैरप्रकार झाल्यास याचे चित्रीकरण मिळवण्यात पोलिसांना अडचणी येण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीड वर्षांपूर्वी लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे प्रशासनाकडे स्थानकात ५० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली होती. तीही अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही. याबाबत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. ठाणे स्थानकात रोज सुमारे सात लाख प्रवासी ये-जा करतात. उपनगरीय रेल्वेगाड्यांसह रोज अडीचशेहून अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. ठाणे स्थानक कायम वर्दळीचे असते.

हेही वाचा – मुंबई-नाशिक महामार्ग ‘खड्ड्यात’; दोन तासांचे अंतर कापण्यासाठी सहा तास खोळंबा

गर्दीच्या वेळी खिसेकापू, मोबाइल चोरांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस नेहमीच करीत असतात. अशा घटना घडल्यास आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरणाचा उपयोग होतो. शिवाय गर्दीत अनेकदा अपघातही घडतात. अनेकदा प्रवाशांमध्ये हाणामारीचे प्रसंग घडतात. कधीकधी तिकीट तपासणीसांशी हुज्जत घालण्याचे प्रकार घडतात. त्यांच्यावर हल्ला करून काही जण पळून जातात. महिलांशी गैरकृत्य केल्याच्या घटनाही अनेकदा निदर्शनास येतात. या सर्व गोष्टींवर देखरेख ठेवण्यासाठी स्थानकात सद्या:स्थितीत १७० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तर स्थानकाबाहेरील परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आणि पालिकेतर्फे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, रेल्वेच्या उदासीन कारभारामुळे स्थानक सद्यास्थितीत पूर्णपणे सीसीटीव्हीच्या कक्षेत आलेले नाही. यामुळे भविष्यात कॅमेरे नसलेल्या भागात कोणतीही दुर्घटना, अपघात अथवा गैरप्रकार झाल्यास आरोपींचा शोध घेणे कठीण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तांत्रिक बिघाडाचेही कारण

स्थानकात १७० कॅमेरे आहेत. यापैकी ३४ कॅमेरे बंद आहेत. पुलांची उभारणी, छत दुरुस्तीमुळे कॅमेर काढून टाकण्यात आले आहेत. इतर काही ठिकाणी यांत्रिकी बिघाडामुळे कॅमेरे बंद आहेत.

हेही वाचा – डोंबिवलीजवळील आजदे गावात इमारतींच्या मोकळ्या जागेत बेकायदा इमारतीची उभारणी

अतिरिक्त कॅमेऱ्यांची प्रतीक्षा

ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असले तरी या कॅमेऱ्यांची संख्या अपुरी आहे. अधिकच्या ५० कॅमेऱ्यांची मागणी लोहमार्ग पोलीस दीड वर्षे करीत आहेत. सध्या १९ कॅमेऱ्यांना मंजुरी मिळाली आहे. ते अद्याप मिळालेले नाहीत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 34 cctv camera in thane station off a question mark on the safety of railway passengers due to lack of surveillance ssb