दर वर्षी पावसाळा जवळ येताच मुंबई, ठाणे यांसारख्या शहरांत सर्वाधिक धावपळ सुरू होते ती नालेसफाईची. मे संपत येताच टक्क्यांच्या प्रमाणात नाले गाळमुक्त झाल्याचे दावे केले जातात. पण तरीही पावसाळ्यात नाले तुंबून परिसरात पाणी साचण्याच्या घटना घडतातच. या पाश्र्वभूमीवर ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शहरांतील नालेसफाईच्या कामांचा वेध घेतला. यंदा ठाण्यातील मुख्य नाल्यांची सफाई वेगाने सुरू असल्याचे दिसून आले; परंतु अजूनही ३५ टक्के नाल्यांची सफाई होणे बाकी असल्याचे आढळून आले. दुसरीकडे, अस्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच टीकेची धनी ठरलेल्या कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये आतापर्यंत, नालेसफाईची अवघी २० टक्के कामे पूर्ण झाली असल्याने या शहरांवर पावसाळ्यात काय परिस्थिती ओढवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठाण्यात अजूनही ३५ टक्के काम बाकी

ठाणे : ठाणे शहरातील १३ प्रमुख आणि ३०६ अंतर्गत नाल्यांतून गाळ उपसण्याची कामे वेगाने सुरू असली तरी आतापर्यंत ६५ टक्के नाल्यांची सफाईच पूर्ण होऊ शकली आहेत. नालेसफाईसाठी महापालिका आयुक्तांनी दिलेली मुदत ३१ मे रोजी संपत असून उरलेली ३५ टक्के कामे सात दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा शहरांतील १३ प्रमुख नाल्यांमध्ये क्रेनच्या साहाय्याने जेसीबी उतरवून त्याच्यामार्फत नालेसफाई करण्यात येत आहे. तसेच शहरातील अंतर्गत रुंद असलेल्या नाल्यांचीही जेसीबीमार्फत सफाई सुरू आहे. उर्वरित अरुंद नाल्यांची मात्र कामगारांतर्फे साफसफाई करण्यात येत आहे. नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ६५ ठेकेदार नेमण्यात आले असून उर्वरित नालेसफाईची कामे लवकरच पूर्ण होतील. तसेच सफाईच्या कामानंतर नाल्याच्या काठावर टाकण्यात आलेला गाळही उचलण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती घनकचरा विभागाचे अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर यांनी दिली.

वागळे इस्टेट भागातील साठेनगर परिसरातील नाला तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने या नाल्याची काही दिवसांपूर्वी सफाई केली असून हे काम चांगल्या प्रकारे झाले असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मात्र, डोंगरातून वाहणाऱ्या या नाल्यालगत मोठय़ा प्रमाणात घरे आहेत. या घरांमधून नाल्यात कचरा फेकला जात असल्याने नाल्यात पुन्हा कचरा जमा झाला आहे. कामगार हॉस्पिटल, कोरस या नाल्यांची सफाई करण्यात आली असून कचरा आणि गाळ मात्र नाल्याच्या काठावर ठेवण्यात आलेला आहे. वर्तकनगर तसेच सिद्धेश्वर तलाव परिसरात नालेसफाईची कामे सुरू आहेत तर उथळसर भागात नाल्यातून मलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागात नालेसफाईचे काम सुरू झालेले नाही. कळवा स्थानक परिसरालगत असलेल्या चिंधी नाल्याच्या सफाईचे काम सुरू झाले असून या नाल्याची सफाई अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे कचऱ्याचे सम्राज्य दिसून येते. पावसाळ्यात या नाल्याचे पाणी कळवा स्थानकात शिरते आणि त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होतो. त्याचप्रमाणे कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातही नालेसफाईची कामे सुरूआहेत.

ठाण्यातील नाल्यांची आकडेवारी..

ठाणे महापालिका हद्दीत सद्य:स्थितीत १३४ किलोमीटरचे एकूण ३०६ नाले आहेत. त्यांपैकी मुंब्य्रात ३१ किलोमीटर लांबीचे ९२ नाले आहेत. कळव्यात ९ किलोमीटरचे ४७, रायलादेवीमध्ये १७ किलोमीटरचे ३७, वर्तकनगरमध्ये १९ किलोमीटर लांबीचे २५, मानपाडय़ामध्ये १७ किलोमीटरचे २६, नौपाडा येथे साडेचार किलोमीटरचे २४, वागळेमध्ये ८ किलोमीटरचे २०, उथळसरमध्ये साडेसात किलोमीटरचे २४ आणि कोपरीत ४ किलोमीटर लांबीचे ११ नाले आहेत. शहरातील ३०६ नाल्यांपैकी १३ प्रमुख नाले आहेत. मानपाडा, कोलशेत, नळपाडा, रामचंद्रनगर, साठेनगर, रामनगर, केळकर कंपनी, तीन हात नाका, कळव्यातील वाघोबानगर, मुंब्य्रातील खडी यंत्र, कौसा, दिवा आणि शीळ गाव या परिसरात हे नाले आहेत. शहराच्या डोंगर भागातून वाहणारे हे नाले खाडीला जाऊन मिळतात. तसेच या नाल्यांना शहरातील छोटे नाले जोडण्यात आले आहेत.

जास्त ठेकेदारांची नेमणूक

नाल्यांच्या सफाईसाठी प्रभाग समितीनुसार प्रत्येकी एक ठेकेदार नियुक्त केला जायचा. मात्र, प्रभाग समितीच्या हद्दीत नाल्यांची संख्या मोठी असल्यामुळे एकाच ठेकेदाराकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण होत नव्हती. या पाश्र्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेने नालेसफाईसाठी ६५ ठेकेदार नेमले आहेत. तसेच त्यांच्याकडून नाल्यांची योग्य प्रकारे सफाई होते की नाही, याची पाहणी करण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ६५ अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

डोंबिवलीत २० टक्के सफाई

डोंबिवली : दर वर्षीप्रमाणे यंदाही कल्याण-डोंबिवलीतील नालेसफाईच्या कामात अतिशय दिरंगाई आणि बेपर्वाई दिसून येत आहे. नाले आणि गटारे सफाईसाठी एकूण सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून २० ठेकेदारांना ही कामे देण्यात आली आहेत.आतापर्यंत नाले सफाईची ४० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासन करीत असले तरी प्रत्यक्षात जेमतेम फक्त २० टक्केच कामे झाल्याचे दिसून येते.

शहरातील नालेसफाईच्या कामांना यंदा ठेकेदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे दोन-तीनदा निविदा प्रसिद्ध कराव्या लागल्या. तरीही अद्याप काही नाल्यांच्या सफाईसाठी ठेकेदार मिळालेले नाहीत. त्यामुळे उपलब्ध ठेकेदारांकडूनच त्या नाल्यांची सफाई करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. या सर्व घोळामुळे यंदा नाले सफाईची कामे उशिरा सुरू झाली.

गटाराच्या किनाऱ्याला काढलेला गाळ ओला असल्याने तो उचलता येत नाही. त्यामुळे तो गाळ सुकल्यानंतर उचलण्यात येणार आहे. मजूर संस्थाचालकांना गटारसफाईची कामे देण्यात आली आहेत. प्रत्येक मजूर संस्थेला पाच ते दहा प्रभागांमधील गटार सफाईची कामे देण्यात आली आहेत. प्रभागातील मध्यम नाले व गटारे यांच्या सफाईची पहाणी करण्यासाठी प्रभाग अधिकारी, पालिका नियंत्रक अधिकारी यांची यादी तयार करण्यात आली असल्याची माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.

कल्याण-डोंबिवली शहरात ९३.४२ किलोमीटर लांबीचे व ४.८१ मीटर रुंदीचे एकूण ८९ मोठे नाले आहेत. ५७०.२२ किलोमीटर लांबीचे ३१७ मध्यम नाले व गटारे आहेत. मोठय़ा नाल्यांच्या सफाईसाठी ३३७.६८ लाख तर मध्यम नाल्यांसाठी २३३.७८ लाख खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

येथील नाले तुंबलेलेच.. 

डोंबिवलीतील औद्योगिक निवासी विभागातील रामचंद्रनगर नाला, सागर्ली चौक नाला, नांदिवली, गांधीनगर नाल्यात मोठय़ा प्रमाणात कचरा साचला आहे. तसेच पश्चिमेला कोपर रेल्वे स्थानकालगत वाहणारा नाला, गोपी सिनेमागृहाजवळील नालाही कचऱ्याने भरून वाहत आहे. कल्याण शहरात कोळसेवाडी नाला, जरीमरी नाला, तिसगाव मुख्य नाला, लोकग्राम, काटेमानिवली, महालक्ष्मी हॉटेलजवळील नाल्यात मोठय़ा प्रमाणात कचरा साचला आहे.

यंत्रांच्या साहाय्याने नाल्यांमधील गाळ व कचरा काढण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. ४० टक्के काम पूर्ण झाले असून जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ामध्ये सर्व नाल्यांची सफाई पूर्ण होईल. प्रभागांमधील मध्यम नाले व गटारे साफसफाईसाठी पालिका नियंत्रक अधिकारी, प्रभाग अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांनी त्या कामावर देखरेख ठेवायची आहे.

– बबन बरफ, उप अभियंता

Story img Loader