किशोर कोकणे

ठाणे : पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरच्या जंगलात दीड महिन्यात ३५० किलो कचरा आढळून आला आहे. ठाण्यातील स्वयंसेवी संस्था आणि काही महाविद्यालयीन तरुणांनी एकत्र येऊन अभियानाद्वारे हा कचरा बाहेर काढला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेला येऊरच्या जंगलात बिबटे तसेच काही दुर्मीळ प्राणी, पक्षी, वनस्पती आढळून येतात. मात्र, गेल्याकाही वर्षांपासून येथील भागात वन विभाग, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अनेक बेकायदा धाबे, हॉटेल आणि बंगले उभारले आहेत. यातील काही बंगले हे राजकीय पुढाऱ्यांचे आहेत. या बंगल्यांवर महापालिका किंवा वन विभागाकडून कारवाई केली जात नाही. काही बंगले हे भाडय़ाने दिले जातात. त्यामुळे मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरातून सुट्टीच्या दिवशी अनेकजण या बंगल्यांमध्ये सुट्टीनिमित्ताने येत असतात. तर, काही ढाबे, उपाहारगृहे देखील या ठिकाणी आहेत.

येऊर वन क्षेत्रात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांकडून पाटर्य़ा केल्या जात आहेत. त्यानंतर तो कचरा त्याचठिकाणी टाकला जात आहे. यासंदर्भात पर्यावरणवादी संघटनांनी आवाज उठवूनही कोणतीही ठोस भूमिका वन विभागाकडून घेतली जात नाही. हा कचरा येऊरच्या जंगलातून बाहेर काढण्यासाठी सुमारे दीड महिन्यांपासून ‘म्युज फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने स्वच्छता अभियान राबवले.

प्राण्यांना धोका

येऊरच्या जंगलात बिबटय़ा, हरण, माकडे यासह अनेक प्राण्यांचा वावर असतो. फुटलेल्या काचेच्या बाटल्यांमुळे हे प्राणी जखमी होऊ शकतात. जमिनीत अडकलेल्या प्लास्टिक पिशव्यांमुळे वनस्पती तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांनाही याचा धोका आहे. तर खाद्य पदार्थ समजून पक्षी प्लास्टिक खाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते खाल्यास पक्ष्यांना ते अपायकारक ठरणारे असल्याचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सांगतात.