येऊर आणि मुरबाडच्या माळरानावर फळझाडांचे रोपण
ठाणे : अनिर्बंध वृक्षतोडीमुळे उजाड होत गेलेली वनसंपदा पुन्हा नव्याने रुजविण्यासाठी शासन स्तरावर गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू असताना त्याचबरोबरीने काही स्वयंसेवी संस्थाही हिरवाई जपण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत आहेत. यंदा ठाण्यातील प्राणिक आरोग्यम् सेंटरने मुरबाडमधील कार्यकर्त्यांच्या मदतीने निरनिराळ्या फळांच्या बियांचा समावेश असलेले सात हजारांहून अधिक मातीचे चेंडू (सीडबॉल्स्) उघडय़ा माळरानावर टाकण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या रविवारी येऊरच्या जंगलात पहिल्या टप्प्यात साडेतीन हजार सीडबॉल्स टाकण्यात आले. त्यानंतर वट पौर्णिमेपासून मुरबाड तालुक्यातील माळशेज परिसरातील पंचक्रोशीमध्ये उर्वरित साडेतीन हजार सीडबॉल्स् टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
निसर्ग साखळी सुरळीत असताना जंगल रुजविण्याची आवश्यकता नव्हती. जंगलातील झाडांवरील फळे विविध पशू, पक्षी खात. त्यानंतर त्यांच्या विष्ठेद्वारे पडणाऱ्या बिया ठिकठिकाणी रुजून हिरवा वसा जपला जाई. मात्र आता अनिर्बंध वृक्षतोडीमुळे रानातील पक्ष्यांची संख्या कमी झाली. परिणामी निसर्गचक्रातील हे महत्त्वाचे आवर्तन थांबले. त्यामुळे नव्याने जंगल रुजविण्याची आवश्यकता भासू लागली. शतकोटी वृक्ष लागवड योजनेद्वारे शासन गेली काही वर्षे उजाड झालेले जंगल पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. या योजनेबरोबरच काही स्वयंसेवी संस्थाही या हरितक्रांतीत खारीचा वाटा उचलत आहेत.
प्राणिक आरोग्यम् सेंटरच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी गेले वर्षभर शहरी भागातील परिचितांना आवाहन करून फळांच्या बिया जपून ठेवायला सांगितल्या. माळरानावर अशाच बिया टाकण्यापेक्षा मातीच्या चेंडूत ठेवल्या तर त्या रुजण्याची शक्यता अधिक असते,असे संस्थेचे कार्यकर्ते आदित्य राऊळ यांनी सांगितले.
मोहिमेत यंदा आम्ही सात हजार सीडबॉल्स टाकीत आहोत. त्यापैकी किमान २० टक्के बियांना अंकुर फुटून रोपे जमिनीत रुजतील, असा विश्वास या मोहिमेचे स्थानिक समन्वयक विराज घरत यांनी व्यक्त केला.
वनसंपदा वाढविण्यासाठी शासन वनखात्यामार्फत शतकोटी वृक्ष लागवड योजना राबवीत आहेच, शिवाय काही स्वयंसेवी संस्थाही त्यात अशाप्रकारे चांगले काम करीत आहेत. अशा उपक्रमांना आम्ही नेहमीच सहकार्य करीत असतो. जंगलातील फळझाडांचे प्रमाण वाढले तर पशू-पक्ष्यांना अधिक चांगले आणि मुबलक अन्न उपलब्ध होईल.
तुळशीराम हिरवे, वनक्षेत्रपाल, टोकावड