कल्याण – कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा आगामी आर्थिक वर्षाचा ३६ कोटी ८३ लाखाचा अर्थसंकल्प बाजार समितीचे सभापती कपील थळे यांनी सादर केला. ४३ लाखांची शिल्लक अंदाजपत्रकात दाखविण्यात आली आहे. समितीने प्रथमच शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले आहे.
बाजार समितीमधील विविध विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आगामी आर्थिक वर्षात २५ कोटी ३१ लाख रुपयांचे कर्ज घेण्याचा नियोजन समितीने केले आहे. राज्य कृषी मंडळाचे अनेक वर्षांचे आठ कोटी ८० लाखाचे कर्ज फेड करून त्यावरील नऊ कोटी ६५ लाख रुपयांचे कर्ज शासनाकडून माफ करून घेण्यात समितीला यश आले आहे.
बाजार समिती आवारात नवीन फूल बाजार उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बाजार समिती आवारात येणारा प्रत्येक माल प्रवेशव्दारावर संगणक प्रणालीतून नोंदून मग त्या वाहनाला समिती आवारात प्रवेश दिला जाणार आहे. महसूल वसुली काटेकोरपणे व्हावी या उद्देशातून हे नियोजन करण्यात आले आहे. या कामासाठी खासगी ठेकेदार नियुक्त केला जाणार आहे, असे सभापती थळे यांनी सांगितले.
हेही वाचा – डोंबिवली रेल्वे स्थानकात विसरलेली मुक्या महिलेची पर्स प्रवाशाच्या जागरूकतेमुळे परत
फूल बाजाराची वास्तू उभारण्यासाठी १० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महसूल वाढीसाठी बाजार शुल्क १० कोटी वसुलीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. भांडवली कामांसाठी १९ कोटी, महसुली खर्चासाठी ११ कोटी ४२ लाखा रुपये खर्च करण्याचे संकेत अर्थसंकल्पात देण्यात आले आहेत.