आठ वर्षांच्या प्रयत्नांनंतर वीज; लवकरच रस्ता, पाणी व शाळाही

शिवकाळ तसेच स्वातंत्र्य चळवळीतील अनेक ऐतिहासिक आठवणींचा साक्षीदार असलेल्या मुरबाड तालुक्यातील सिद्धगडावर २००९ मध्ये दरड कोसळून ग्रामस्थ विस्थापित झाले होते. भीमाशंकर अभयारण्यातील ग्रामस्थांनी नव्याने दिलेल्या जागी तब्बल आठ वर्षे विजेची वाट पाहिली. अखेर सिद्धगडच्या ३८ कुटुंबीयांच्या घरात विजेवरील दिव्यांनी उजळून निघाला.

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात हिराजी पाटील आणि भाई कोतवाल यांनाही  याच ठिकाणी वीरमरण आले. त्यामुळे सिद्धगडाला विशेष महत्त्व आहे. येथे किल्लय़ावर एक वस्तीही होती. वस्ती पुणे जिल्ह्य़ातील भीमांशकर अभयारण्यात तर यांचा महसूल विभाग ठाणे जिल्हा असल्याने या ग्रामस्थांची अनेकदा फरपट होत असे. यातच २००९ च्या पावसात येथे दरड कोसळल्याने किल्लय़ावरील वस्तीची हानी झाली. त्यात भीमाशंकर अभयारण्याच्या क्षेत्रात येत असल्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. वस्तीपासून जवळपास १० किलोमीटर असलेल्या डोंगरन्हावे ग्रामपंचायत हद्दीतील १०३ हेक्टरवर येथील ३६ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र तेव्हापासून येथे विजेची सोय नव्हती.

तीन वर्षांपूर्वी वीजपुरवठय़ासाठी काम सुरू झाले. मात्र अभयारण्यांच्या नियमांमुळे त्यात अडथळा आला. त्यानंतर इतर गावांच्या अडथळ्यांमुळे वीज पुरवठय़ाचे काम थांबले.  स्थानिक आमदार किसन कथोरे आणि महावितरणाच्या समन्वयाने वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हालल्याने वीज पुरवठय़ाचा मार्ग मोकळा झाला. रायगड जिल्ह्य़ाच्या सीमेवर असल्यानेही विजेचे खांब टाकण्याचे काम रेंगाळले होते.

सर्व अडथळे दूर झाल्यानंतर गेल्या गुरुवारी वीज पुरवठा सुरू करण्यात आला.  यावेळी ग्रामस्थांच्या पूर्वीच्या खानिवरे ग्रामपंचायतीचे आणि सध्याच्या डोंगरन्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामस्थांनी यावेळी मोठी हजेरी लावली होती.

२६ घरांमध्ये वीजमीटर

मुरबाडपासून ३० किलोमीटरवर अंतरावर असलेल्या या डोंगरन्हावे ग्रामपंचायत हद्दीतील या गावात यापुढे रस्त्याची आणि पाण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे यावेळी स्थानिक आमदारांनी सांगितले. तसेच प्राथमिक शिक्षणासाठीही येथे जे शक्य ते करण्यात येण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले आहे. सध्या ३६ पैकी २६ घरांत वीजमीटर लावण्यात आले असून महावितरणातर्फे एक विजेचा बल्बही देण्यात आला आहे. तर इतर १० झोपडीवजा घरांमध्येही लवकरच मीटर लावण्यात येणार असल्याचे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.