डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा भोईरवाडी भागात नव्याने बांधण्यात आलेल्या गृहसंकुल भागातील रस्त्यांची दुदर्शा झाली आहे. बारही महिने या भागातील रहिवासी खड्डे, माती, धुळीतून येजा करतात. या भागातील खराब रस्त्यांमुळे रिक्षा चालक प्रवासी वाहतुकीसाठी भोईरवाडी भागात येत नाही, अशा या भागातील रहिवाशांच्या तक्रारी आहेत. अशा रस्त्यावर गेल्या १२ वर्षाच्या काळात कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम विभागाने दोन कोटी ९६ लाख रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती पालिकेने माहिती अधिकारात उपलब्ध करुन दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या भागातील भोईरवाडी, आदर्श पार्क ते झोपु योजना घरे पर्यतचा विकास आराखड्यातील रस्ते कामासाठी २०१४ मध्ये स्थायी समितीने चार कोटी ३५ लाख रुपये मंजूर केले आहेत. या रकमेतील आतापर्यंत दोन कोटी ९६ लाखाचा निधी खर्च झाल आहे.ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्या जवळील माॅडेल महाविदयालय परिसरात भोईरवाडी आहे. या भागात १२ हून अधिक नवीन टोलेजंग गृहसंकुले बांधण्यात आली आहेत. निसर्गरम्य वाहनांच्या गजबजाटापासून दूर म्हणून रहिवाशांनी या भागात घरे घेतली.

हेही वाचा : डोंबिवली : विद्यार्थ्याला बस चालकाने २५ मीटर फरफटत नेले

या गृहसंकुलाच्या भागात सुरुवातीला विकासकाने कच्चे रस्ते बांधून आपली इमारत उभारणीची कामे करुन घेतली. या गृहसंकुल भागातील रस्ते विकास आराखड्यातील असल्याने पालिकेने विकासकांकडून हे रस्ते सुस्थितीत बांधून घेणे आवश्यक होते. परंतु, विकासकांनी संकुलांची कामे झाल्यानंतर तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे या भागातील रहिवाशांना गेल्या बारा वर्षापासून खाचखळगे असलेल्या मातीच्या रस्त्यावरुन येजा करावी लागते. पावसाळ्यात या खळग्यांमध्ये पाणी साचत असल्याने रात्रीच्या वेळेत या भागातून चालणे अवघड होते. या भागातील रहिवाशांच्या रेट्यामुळे पालिकेने या भागात डांबरीकरणाची कामे केली. ही कामे उत्तम बांधकाम साहित्याची नसल्याने लवकरच हे रस्ते खराब होऊ लागले. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यांची चाळण होते. ते रस्ते नंतर दुरुस्त केले जात नाहीत, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा : डोंबिवली : ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्दुल्ल्यांचा प्रवाशांना उपद्रव

पालिकेला मालमत्ता, पाणी देयकातून सर्वाधिक महसूल खंबाळपाडा, भोईरवाडी भागातून देण्यात येतो. तरी या भागातील रस्ते सुस्थितीत करण्यासाठी प्रशासन पुढाकार घेत नसल्याने या भागातील रहिवासी नाराजी व्यक्त करत आहेत. भोईरवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते राहुल शेलार यांनी पालिकेकडे माहिती अधिकारात अर्ज करुन भोईरवाडीतील रस्ते कामासाठी अकरा वर्षात किती निधी पालिकेने खर्च केला, या कामाचा ठेकेदार कोण, या कामावर कोणत्या बांधकाम अभियंत्यांचे नियंत्रण होते याची माहिती मागविली होती. या माहितीमधून रस्ते कामाचा खर्च उघड झाला आहे.
या रस्ते कामावर १२ वर्षात निवृत्त कार्यकारी अभियंता परवेझ तडवी, सुभाष पाटील, विजय पाटील, उपअभियंता बाळासाहेब जाधव, सुभाष पाटील, शैलेश मळेकर, कनिष्ठ अभियंता अनिल वांगसकर, भगतसिंह राजपूत, विनय रणशूर यांचे नियंत्रण होते. या रस्त्याचे काम मे. शंकर ट्रेडर्स या ठेकेदाराने केले आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

या रस्ते कामा निधीतून गटारे, खडीकरण, डांबरीकरणाची कामे करण्यात आली आहेत. या रस्त्यासाठी दक्षता व गुणनियंत्रण विभागाचे स्वतंत्र निरीक्षण अहवाल अभिलेखात उपलब्ध नसल्याचे पालिकेने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीत म्हटले आहे.खंबाळपाडा-आदर्श पार्क-भोईरवाडी ते झोपु प्रकल्प विकास आराखड्यातील रस्ता तयार करण्यासाठी स्थायी समितीने मे. शंकर ट्रेडर्स या ठेकेदाराची निविदा मंजूर करून या कामासाठी चार कोटी ३५ लाख १३ हजार ३९८ रुपये मंजूर केले होते. ही कामे सुस्थितीत न झाल्याने त्याचा फटका भोईरवाडी भागातील रहिवाशांना बसत आहे. या भागातील नागरिकांनी मागील वर्ष सुस्थितीत रस्त्यासाठी मूक आंदोलन केले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 crore sanctioned in 2014 road khambalpada bhoirwadi residents travel through pit in dombivali tmb o1