* लांबपल्ल्याच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका ल्ल उपनगरी वाहतूक मार्गावरील भार घटणार
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या ‘सॅटेलाइट टर्मिनस’ संकल्पनेतील ठाकुर्ली टर्मिनस होण्यासाठी खूप कालावधी लागणार असल्याने आता मध्य रेल्वेने उपनगरीय व लांबपल्ल्याच्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी कल्याण जंक्शनची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. या प्रस्तावानुसार कल्याण स्थानकात आणखी चार फलाटांची भर पडणार आहे. सध्या मालगाडय़ांसाठी असलेल्या मार्गिकांमधील चार मार्गिकांच्या जागी हे प्लॅटफॉर्म होणार असून त्यामुळे लांबपल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक स्वतंत्रपणे होणार आहे. परिणामी उपनगरीय मार्गाची वाहतूकही सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
उपनगरीय व लांबपल्ल्याच्या गाडय़ांच्या वाहतुकीच्या दृष्टीने कल्याण जंक्शन अत्यंत मोक्याचे आहे. कसारा-कर्जत या दोन्ही दिशांकडून येणाऱ्या गाडय़ांची या स्थानकात कोंडी होते. अनेकदा अप-डाऊन दोन्ही मार्गानी या स्थानकापर्यंत वेळेत येणाऱ्या गाडय़ा या स्थानकात खोळंबतात आणि त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. ही कोंडी सोडवण्यासाठी मध्य रेल्वेने आता कल्याण यार्ड पुनर्रचनेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. ही कामे करण्यासाठी १८ ते २० कोटी रुपये खर्च होणार असल्याची शक्यता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केली. कल्याण जंक्शनमध्ये सध्या पश्चिमेकडून पूर्वेकडे १ ते ८ फलाट आहेत. फलाट क्रमांक आठच्या पूर्वेकडे रेल्वेची खूप जागा आहे. सध्या या जागेत मालगाडय़ांची वाहतूक होते. या जागेतून निघणारी एक मार्गिका उन्नत स्वरूपात कसारा मार्गावर जाते. त्यामुळे उपनगरीय रेल्वेमार्ग ओलांडायची गरज पडत नाही. ही जागा रेल्वे चार नव्या फलाटांसाठी वापरणार आहे. या जागेत मालगाडीसाठीच्या चार मार्गिका घेऊन त्या ठिकाणी लांब
पल्ल्याच्या गाडय़ांसाठी चार फलाट तयार होणार आहेत. तर मालगाडीसाठी या मार्गिकांच्या पूर्वेकडे असलेली रेल्वेची जागा वापरण्यात येणार आहे.
वाहतूक कशी होणार?
हे चार फलाट तयार झाल्यानंतर कल्याण स्थानकात उपनगरीय आणि लांबपल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक स्वतंत्रपणे होईल. कसाऱ्यावरून येणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाडय़ा मालगाडीसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या उन्नत मार्गावरून थेट या फलाटांच्या दिशेने येतील. कर्जतकडून येणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाडय़ाही थेट येथे येणार आहेत. सध्याचे आठही प्लॅटफॉर्म फक्त उपनगरीय गाडय़ांसाठी वापरात येतील.