कल्याण – शासनाच्या परवानगीविना कल्याण पूर्वेतील मलंग गड रस्त्यावरील नांदिवली तर्फ येथील तलावाजवळील गुरचरण जमिनीवर उभारण्यात आलेली ४० घरे कल्याण डोंबिवली पालिका आणि महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईतून बुधवारी जमीनदोस्त करण्यात आली.
नांदिवली तर्फ तलाव परिसरात उपप्रादेशिक परिवहन विभागाचे ३० एकर जागेत वाहन तपासणी, चाचणी केंद्र आहे. चाचणी केंद्राच्या एका भागात नांदिवली तलावाजवळ गुरचरण जमिनीवर स्थानिक, भूमाफियांनी घरे, व्यापारी गाळे, बेकायदा चाळी बांधल्या होत्या. या भागात नव्याने रस्ते बांधणी, सुविधा देताना या घरांचा अडथळा येणार होता. गुरचरण जमिनीवरील या बेकायदा बांधकामांविषयी ‘आय’ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्यांनी या प्रकरणी महसूल विभागाला एक प्रस्ताव पाठवून गुरचरण जमिनीवरील बांधकामे पाडण्यासाठी कळविले होते. तहसीलदार जयराज देशमुख यांनी पालिकेच्या पत्राची दखल घेतली. नांदिवली तलावाजवळील बेकायदा बांधकामे पाडण्याचे निश्चित केले. पालिका आणि महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईने ही बांधकामे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा – ठाणे : एक महिन्यात ४२ मुलांचे पुनर्वसन, जिल्हा महिला बालविकास विभागाची कामगिरी
पालिकेच्या साहाय्यक आयुक्त मुंबरकर, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी असा ताफा बुधवारी नांदिवली तलाव येथे येऊन दोन तासांच्या कारवाईत गुरचरण जमिनीवरील ४० बेकायदा बांधकामे भुईसपाट करण्यात आली. काही रहिवाशांनी यावेळी विरोध करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना समज देऊन तेथून हटविले.
“नांदिवली तलावाजवळील गुरचरण जमिनीवर पक्की बांधकामे करून त्यामधील घरे विकली जात आहेत. या जागेचा व्यावसायिक वापर सुरू झाल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या होत्या. ही माहिती आपण महसूल विभागाला कळविली. संयुक्त कारवाई करून गुरचरण जमिनीवरील बांधकामे जमीनदोस्त केली.” हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग. कल्याण.