बेथलेहेम चर्च, डोंगरी
भाईंदर पश्चिमजवळील डोंगरी हे गाव नावाप्रमाणेच डोंगरावर म्हणजे उंच टेकडीवर वसलेले आहे. या गावात इरिमित्र टेकडीवर वसलेल्या बेथलेहेम चर्चला ४०० वष्रे पूर्ण झाली आहेत. मीरा-भाईंदर शहरात असलेल्या विविध चर्चपैकी काशिमीरा आणि भाईंदर येथील पुरातन चर्चनंतर बेथलेहेम चर्च सर्वात जुने चर्च म्हणून ओळखले जाते. या चर्चची बांधणी १६१३ साली करण्यात आली.
भौगोलिक परिस्थितीमुळे डोंगरी गावातील रहिवासी इतरांपासून काहीसे अलिप्त झाले होते. त्या काळी गोराई येथील वैराळा तलावाकाठी वसलेले चर्च आणि भाईंदर पश्चिम येथील चर्च ही दोनच चर्च डोंगरी गावकऱ्यांसाठी होती. गोराईला जाणे फार दूरचे पडायचे आणि भाईंदरला जायचे तर खाडी ओलांडून जाणे जोखमीचे वाटे. डोंगरी गावातून निघणारे दगड त्या वेळी विशेष प्रसिद्ध होते. वसई किल्ल्यातील चर्चची बांधणी या दगडांपासूनच करण्यात आली आहे. अगदी गोव्यापर्यंतही येथील दगड जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळे वसई किल्ल्यातील धर्मगुरूंना डोंगरी गाव तसा परिचयाचा होता. डोंगरी गावातील रहिवाशांची अडचण या धर्मगुरूंनी ओळखली. येथील रहिवाशांची आध्यात्मिक गरज लक्षात घेऊन १६१३ मध्ये फ्रान्सिस्को आझवेडो या जेज्वीट धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली हे चर्च उभे राहिले. भाईंदरचे चर्च नाझरेथ माऊलीच्या नावे उभारण्यात आले होते. नाझरेथ हे येशू ख्रिस्ताचे गाव आणि बेथलेहेम हे त्याच्या जन्माचे गाव म्हणून डोंगरी चर्चला बंथलेहेम हे नाव देण्यात आले.
हे चर्च उत्तराभिमुख असून धारावी बेटावरील सर्वात उंच असे चर्च आहे. चर्चचा दर्शनी भाग आणि त्यावरील क्रूस इतका उंचावर आहे पावसाळ्यात अनेकवेळा हा क्रूस ढगात अदृश्य होत असतो. सर्वात उंचावर असलेले हे चर्च आकारमानानेही मोठे आहे. एकावेळी ९०० भक्तगण या चर्चमध्ये प्रार्थनेसाठी सहज बसू शकतात. डोंगरी, तारोडी, पाली आणि चौक या गावातील रहिवासी या गावचे आध्यात्मिक नेतृत्व हे चर्च पार पाडते. सुरुवातीच्या काळात उत्तनमधील भाविकही या चर्चमध्ये येत असत, मात्र १६३४ मध्ये उत्तन गावात चर्च बांधण्यात आल्यानंतर त्यांचा या चर्चकडचा ओघ कमी झाला. तत्कालीन जेज्वीट धर्मगुरूंनी सरकारच्या मदतीने संपूर्ण डोंगरी आपल्या आधिपत्याखाली घेतले. धर्मगुरूंनी चर्च टेकडीच्या पठारावर बांधले, त्यासोबत टेकडीच्या माथ्यावर एक मठही बांधला. निवांतपणे आणि एकाग्रतेने प्रार्थनेसाठी ही जागा अत्यंत सोयीस्कर आहे. श्रद्धाबांधणीसाठी या जागेचा वापर मोठय़ा प्रमाणात होऊ लागला. या ठिकाणी उभे राहिले की संपूर्ण धारावी बेट तसेच वसईचा परिसरही अगदी सुस्पष्टपणे दिसतो. प्रत्येक महिन्यांच्या १३ तारखेला फातिमा मातेची आठवण म्हणून या ठिकाणी मिस्सा म्हटला जातो.
सामाजिक कार्यही..
सध्या या चर्चचा कारभार फादर पीटर डिकुन्हा पाहत आहेत. आध्यात्मिक शिकवणीसोबतच चर्चकडून सामाजिक कार्यही हाती घेण्यात आले आहे. चर्चच्या माध्यमातून प्रेरणा सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. केंद्राकडून महिला, विधवा, वरिष्ठ नागरिक, शेतकरी यांच्यासाठी मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जातात. त्यासाठी विविध विषयातील तज्ज्ञ आणि सरकारी अधिकारी या ठिकाणी पाचारण केले जातात. काही दिवसांपूर्वीच येथील शेतकऱ्यांना शेतीचे धडे देण्यासाठी नाशिक येथे प्रशिक्षण दौरा आयोजित करण्यात आला होता. शिवाय चर्चकडून चालविण्यात येणाऱ्या १ ते ४ या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचे इंग्रजी पक्के करण्यासाठी त्यांचे इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाते.