लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : येथील पूर्व भागातील सुनीलनगरमधील बहिणाबाई चौधरी उद्यान जवळील नगरभूमापन कार्यालयात बुधवारी घेण्यात आलेल्या फेरफार अदालतमध्ये जमिनीशी संबंधित फेरफार नोंदीबाबतची ४१ प्रकरणे मार्गी लावण्यात उप अधीक्षक भूमी अभिलेख व नगरभूमापन विभागातील अधिकाऱ्यांना यश आले.

कल्याण भूमी अभिलेख विभागातील उप अधीक्षक नितीन साळुंखे यांच्या पुढाकारातून डोंबिवलीत फेरफार अदालतचा कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला होता. भूमि अभिलेख उप अधीक्षक साळुंखे आणि नगरभूमापन विभागातील परिक्षण भूमापक यांनी एकत्रितपणे घेतलेल्या या अदालतमध्ये एकूण ४१ नागरिकांची डोंबिवली परिसरातील फेरफारासंदर्भातची प्रकरणे मार्गी लागली.

डोंबिवलीमधील नगरभूमापन परिक्षेत्रातील ठाकुर्ली, चोळे, आयरे, शिवाजीनगर आणि परिसरातील मिळकत पत्रिकेवरील काही नागरिकांचे विविध प्रकारच्या फेरफार नोंदी विषयीचे अनेक प्रश्न काही वर्षांपासून प्रलंबित होते. या नोंदीबाबत काही तांत्रिक अडचणी होत्या. हे नागरिक नियमित भूमि अभिलेख, नगरभूमापन विभागात फेऱ्या मारून आपली प्रकरणे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत होते. अशाप्रकारचे अनेक नागरिक मिळकत पत्रिकेवर फेरफार नोंदीसाठी प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आल्यावर उप अधीक्षक भूमि अभिलेख नितीन साळुंखे यांच्या पुढाकाराने नगरभूमापन डोंबिवली यांच्या सहकार्याने हा फेरफार नोंदीचा नागरिकांचा विषय कायमचा एकाच ठिकाणी एक खिडकी पध्दतीसारखा मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

यासाठी बुधवारी डोंबिवलीत फेरफार अदालत घेण्यात आली. या अदालतमध्ये ४१ नागरिकांनी काही महिन्यांपासून रखडलेली मिळकत पत्रिकांवरील फेरफार नोंद, मानीव अभिहस्तांतरण, खरेदी दस्तऐवजाने फेरफार नोंद करणे, बोजा मधील नोंद कमी करणे, धारणाधिकार बदल, दस्तऐवजावरील नावात बदल, मिळकतीवरील मयत व्यक्तिचे नाव कमी करणे अशी प्रकरणे मार्गी लावण्यात आली. एकाच व्यासपीठावर एकाच ठिकाणी धावपळ न करता फेरफार नोंदीचे काम झाल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.