कल्याण- कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका जवळील दोन किराणा मालकांकडून पोलिसांनी विना परवाना जवळ बाळगलेल्या ४२ औषधाच्या बाटल्यांचा साठा जप्त केला. आरोग्याला अपायकारक होईल अशी विनापरवाना औषधे बाळगल्याने पोलिसांनी दुकान मालका विरुध्द औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण पूर्वेतील पत्रीपुला जवळील होम बाबा टेकडी येथील हरीष किराणा स्टोअर्सचे मालक इरफान इमामुद्दीन शेख (३०), शौकत इक्बाल शेख (३७) यांच्या विरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात हवालदार आनंद कांगरे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी रात्री दहा वाजता हा प्रकार पोलिसांनी गस्त घालत असताना उघडीकाला आणला.
हेही वाचा >>> कल्याणमधील मलंग गड रस्त्यावरील भाल गावातील चाळी जमीनदोस्त
ईरफान, शौकत हे औषध आणि प्रशासन विभागाकडून परवाना न घेता खोकल्याची वेगळ्या प्रकारची औषधे दुकानाच्या माध्यमातून विकत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस त्यांच्या पाळतीवर होते. गुरुवारी रात्री दहा वाजता पोलिसांची गस्त सुरू असताना सांगळेवाडी स्मशानभूमी रस्त्यावर आरोपी शौकत, इरफान खोकल्याची ४२ बाटल्यांमधील औषधे स्वता जवळ बाळगून होते.
गस्तीवरील पोलिसांनी त्यांना कब्जात असलेल्या वस्तू दाखविण्याची सूचना केली. त्यांनी टाळाटाळ केली. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांना खोकल्याची औषधे आढळून आली. मानवी आरोग्याला घातक ठरतील अशी औषधे आपण बाळगत आहोत, याची माहिती असुनही आरोपींनी ती जवळ बाळगली. औषध विक्रेतेचा परवाना आरोपींजवळ आढळून आला नाही.
हेही वाचा >>> घोषणा केल्या, कामे आणली म्हणून विकास कामे मार्गी लागत नाहीत, मनसे आमदार प्रमोद पाटील यांची शिवसेनेवर टीका
औषध बाटल्या कोठुण आणल्या, त्याचा वापर ते कोठे करणार होते, याची समाधानकारक उत्तरे आरोपी देऊ शकले नाहीत. पोलिसांनी त्यांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. उपनिरीक्षक किरण भिसे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी औषध विक्रेत्यांनी सांगितले, खोकल्याची काही औषधे गुंगी आणणारी असतात. त्यामुळे खोकल्याचा काही औषधांचा वापर मद्यपी, गर्दुल्ले गुंगी येण्यासाठी करतात. गांजाची ओढ असलेले पण तो खरेदीची क्षमता नसलेले व्यसनी गुंगी येणारी औषधे खरेदी करतात. औषध दुकानात आता चिठ्ठी शिवाय औषधे दिली जात नाहीत म्हणून किरणा विक्रेते चोरुन अशा औषधांची विक्री करतात.