ठाणे : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत १२३ पर्यावरणपुरक वीजेवरील बसगाड्या खरेदी करण्यात आल्या असून त्यापाठोपाठ आता आणखी ४२ वीजेवरील बसगाड्या खरेदी करण्याची प्रक्रिया परिवहन प्रशासनाने सुरू केली आहे. या कामासाठी प्रशासनाने निविदा काढल्याने येत्या सहा महिन्यांत या बसगाड्या टिएमटीच्या ताफ्यात दाखल होण्याची चिन्हे आहेत.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण ३६४ बसगाड्या आहेत. त्यापैकी उपक्रमाच्या स्वत:च्या १२४ बसगाड्या आहेत. तर, उर्वरित २२० बसगाड्या ठेकेदारामार्फत जीजीसी तत्वावर चालविण्यात येत आहेत. एकूण ३६४ पैकी ३०० बसगाड्या प्रत्यक्षात प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत आहेत. ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. यामुळे प्रवासी संख्येच्या तुलनेत बसगाड्यांची संख्या अपुरी आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका तसेच परिवहन प्रशासनाने बसगाड्यांची संख्या वाढविण्यावर गेल्या काही वर्षांपासून भर दिला आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत १२३ पर्यावरणपुरक विजेवरील बसगाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. जून महिनाअखरेपर्यंत या सर्व बसगाड्या परिवहनच्या ताफ्यात दाखल होणे अपेक्षित असताना केवळ १३ बसगाड्या आतापर्यंत उपलब्ध झाल्या आहेत. बसगाड्या देण्यास उशीर केल्याप्रकरणी परिवहन प्रशासनाने ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली आहे. उर्वरित बसगाड्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत उपलब्ध व्हाव्यात, असा आग्रह प्रशासनाने ठेकेदाराकडे धरला आहे. तसेच दुसरीकडे आणखी बसगाड्यांच्या खरेदीवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. ठाणेकरांना लवकरात लवकर प्रवासी सुविधेसाठी बस उपलब्ध व्हाव्यात यासाठी जुन्या ठेकेदाराऐवजी इतर ठेकेदाराकडून या बस खरेदी करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत यंदाही परिवहन प्रशासनाला १५ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतूनही ४२ बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्यासाठी निविदा काढली आहे. जीसीसी तत्वावर या बसगाड्यांची खरेदी करण्यात येणार आहे. १८ जुलैपर्यंत निविदा भरण्याची मुदत असून त्यानंतर या निविदा उघडून त्यातून ठेकेदार निवडण्यात येणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
हेही वाचा – नागपूर : ‘वस्त्रसंहिता’नंतर आता राज्यातील मंदिर परिसरात ‘मद्य-मांस मुक्त’ अभियान
पर्यावरणपुरक अशा वीजेवरील ४२ बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. त्यात ९ मीटरच्या २५ तर, १२ मीटरच्या १७ बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. या कामासाठी पालिकेने निविदा काढली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सहा महिन्यांत या बसगाड्या टिएमटीच्या ताफ्यात दाखल होऊ शकतील, असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.