लोकसत्ता खास प्रतिनिधी
ठाणे: पावसाळ्यात इमारत कोसळून होणारी दुर्घटना टाळण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये संपुर्ण शहरात ४ हजार २९७ इमारती धोकादायक असल्याची बाब पुढे आली आहे. त्यात ८६ इमारती अतिधोकादायक इमारती असून त्यापैकी २० इमारतींचे बांधकाम पाडण्यात आले आहे. उर्वरित ६६ इमारतींचे बांधकाम पाडण्याचे काम पालिकेमार्फत सुरू आहे.
ठाणे शहर, वागळे इस्टेट, कळवा आणि मुंब्रा भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा इमारती आहेत. तसेच नौपाडा परिसरातील अधिकृत इमारती मोडकळीस आल्या आहेत. अशा इमारती पावसाळ्यात कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. यापुर्वी अशा घटना घडल्या असून त्यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते. सी-१, सी-२ए , सी२बी आणि सी३ अशा चार टप्प्यांत धोकादायक इमारतींचे वर्गीकरण करण्यात येते. यंदाही पालिका प्रशासनाने पावसाळ्यापुर्वी शहरातील इमारतींचे नुकतेच सर्वेक्षण केले आहे. यामध्ये संपुर्ण शहरात ४ हजार २९७ इमारती धोकादायक असल्याची बाब पुढे आली आहे. यात सी -१ मध्ये अतिधोकादायक इमारतींचा समावेश असतो. या इमारतीमधील रहिवाशांचे इतरत्र पुनर्वसन करून त्या इमारतींचे बांधकाम पाडण्यात येते. यंदाही महापालिका प्रशासनाने अशाप्रकारे शहरातील ८६ अतिधोकादायक इमारतींचे बांधकाम पाडण्याचे काम सुरू केले असून त्यापैकी २२ इमारतींचे बांधकाम पाडले आहे. उर्वरित ६६ इमारतींमधील रहिवाशांना सदनिका रिकाम्या करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या असून जशा इमारती रिकाम्या होत आहेत, तशा त्यांचे बांधकाम तोडण्यात येत आहे.
आणखी वाचा-कल्याण रेल्वे स्थानकात २४ तासांत ११ मोबाईलची चोरी, सातजण अटकेत
नौपाडा- कोपरीत सर्वाधिक अतिधोकादायक इमारती
ठाणे महापालिका क्षेत्रात ८६ अतिधोकादायक तर १९२ धोकादायक इमारती आहेत. त्यापैकी एकट्या नौपाडा-कोपरी विभागात ५२ अतिधोकादायक तर, २६ धोकादायक इमारती आहेत. वागळे इस्टेट आणि दिवा भागात मात्र एकही अतिधोकादायक इमारत नाही. तसेच वागळे इस्टेटमध्ये ३ तर, दिवा भागामध्ये २ धोकादायक इमारती आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचे सी-१, सी-२ ए, सी-२बी आणि सी-३ अशा चार टप्प्यांत वर्गीकरण केले आहे. सी-१ म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तात्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत, सी-२ ए म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे, सी-२ बी म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे आणि सी-३ म्हणजे इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणे. त्यामुळे सी-२ बी आणि सी-३ च्या यादीत ४ हजार १९ धोकादायक इमारती असल्या तरी त्याठिकाणी रहिवास वापर सुरूच राहणार आहे.