ठाणे : कळवा येथील एका खासगी शाळेतील ४० हून अधिक विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याच्या घटनेला दोन आठवडे होत नाहीत तोच गुरुवारी दुपारी दिवा येथील आगासन भागातील ठाणे महापालिकेच्या शाळेतील पाचवी ते सहावीच्या वर्गातील ४४ विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

या मध्यान्ह भोजनात पाल मृत अवस्थेत आढळून आली असून विषबाधा झालेल्या ४४ विद्यार्थ्यांपैकी ३९ मुलांना पोटदुखी आणि उलटीचा जास्त त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर, इतर मुलांनाही उपचारासाठी दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा…रेल्वे प्रवाशांना बिस्किटमधून गुंगीचे औषध देऊन, चोऱ्या करणारा कल्याण रेल्वे स्थानकात अटक

दिवा येथील आगासन भागात ठाणे महापालिका शाळा क्रमांक ८८ आहे. या शाळेत दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे मधल्या सुट्टीत खिचडी देण्यात आली होती. परंतू, या खिचडीतून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या खिचडीत मृत पाल असल्याचे आढळून आल्याचा दावा येथील स्थानिक रोहीदास मुंडे यांनी केला आहे. हे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे ४४ विद्यार्थ्यांना पोटदुखी आणि उलटीचा त्रास होऊ लागला. शाळेने तात्काळ याची सुचना महापालिका अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच, ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्ण्यालयातून डॉक्टरांचे पथक शाळेत पोहोचले. त्यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. त्यावेळी ४४ पैकी ३९ मुलांना पोटदुखी आणि उलटीचा सर्वाधिक त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना तात्काळ कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर, इतर मुलांनाही रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलांची संख्या वाढण्याची शक्यता कळवा रुग्णालयाकडून वर्तविण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यात दिवा विभागात अशा दोन ते तीन घटना घडल्या असल्याचा दावा रोहीदास मुंडे यांनी केला आहे.