कल्याण : ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील खेडेगाव, आदिवासी दुर्गम भागात असलेल्या ५७७ अंगणवाड्यांपैकी सुमारे ४६० अंगणवाड्यांना महावितरणचा वीज पुरवठा नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना अनेक ठिकाणी अंधारात, वर्गात पंखात नसल्याने घामाघूम होत बालकांना शिक्षणाचे धडे द्यावे लागत आहेत. घरात पंख्याची सवय असल्याने अंगणवाडीतील लहान बालके अंगणवाडीत पंखा, काही ठिकाणी खिडक्या नसल्याने अंगणवाडीत रमत नसल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या अस्वस्थतेमुळे अनेक बालके अंगणवाडीत रडारडी करतात. त्यांना सांभाळताना अंगणवाडी सेविकांची दमछाक होत आहे. शहापूर तालुक्यातील बहुतांशी अंगणवाड्या गावातील समाज मंदिर सभागृहात, गावकीचे देऊळ, काही गावातील मोठे घर असलेल्या ग्रामस्थांच्या घरात भरविल्या जातात. शासन, ग्रामपंचायत मालकीच्या जागेत स्वतंत्रपणे अंगणवाड्या चालविल्या जात आहेत. अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत असल्याची संख्या शहापूर तालुक्यात तुरळक आहे.

आणखी वाचा-ठाण्यात गेल्या वर्षभरात ७५ टक्के गुन्हे उघडकीस

बालकांना शाळेची ओढ लागावी. बालवयापासून त्यांच्यावर विविध प्रकारचे चांगले संस्कार व्हावेत. गावातील विविध प्रकारच्या बालकांना एकत्र आणून त्यांना खेळ, गाणी, मनोरंजन, मौजमजेचे धडे द्यावेत. या पीढीला नंतर शाळेत जाण्यासाठी अवघड वाटू नये. त्यांच्यात शाळेची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशातू शासनाकडून गाव, शहर स्तरावर अंगणवाडी उपक्रम राबविला जातो.

महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत शहापूर तालुक्यात अंगणवाड्यांचे दोन विभाग आहेत. शहापूर प्रकल्पांतर्गत २८६, दुर्गम भागातील डोळखांब प्रकल्पांतर्गत २९१ अंगणवाड्या आहेत. या एकूण ५७७ पैकी सुमारे ४६० अंगणवाड्यांमध्ये महावितरणची वीज जोडणी नाही. त्यामुळे तेथे उजेडासाठी वीजेचे बल्ब, पंखा नाही. शासनाचे बहुतांशी उपक्रम अलीकडे ऑनलाईन माध्यमातून राबविले जातात. यासाठी अंगणवाडीत इंटरनेटची गरज असते. वीज जोडणी नसल्याने अंगणवाडी सेविकांना खासगी इंटरनेटचा वापर करून शासकीय कामे करावी लागतात. काही अंगणवाड्या घर मालकांनी गावातील मुलांना गावातच शिक्षण मिळावे या उद्देशातून घरातील जागा अंगणवाडी म्हणून वापरण्यास दिली आहे. याठिकाणी मालक घरातील विजेचा वापर करण्यास सेविकांना मज्जाव करतात. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत अंगणवाडी सेविकांना बालकांना शिकवावे लागते.

आणखी वाचा-ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून ८२ लाखांची फसवणूक, गुंतवणूक नियोजकाची आत्महत्या

राज्यातील अंगणवाड्यांना वीज जोडणी देण्याचे आदेश शासनाने संबंधित विभागांना दिले आहेत. या आदेशाप्रमाणे शहापूर तालुक्यातील महिला व बाल कल्याण विभागातर्फे वीज पुरवठा नसलेल्या अंगणवाड्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे शहापुर तालुक्यातील अंगणवाड्यांना वीज जोडणी देण्याच्या दृष्टीने आढावा घेतला जात आहे. प्रत्येक अंगणवाडीला वीज जोडणी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. काही अंगणवाड्यांना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सौर संचाच्या माध्यमातून वीज जोडणी देण्याचे प्रयत्न आहेत. -धनश्री साळुंखे, महिला व बालकल्याण अधिकारी, शहापूर.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 445 anganwadis in shahapur taluka in darkness due to lack of electricity connection mrj