ठाणे : भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या स्थानकांचा सामावेश असून जिल्ह्यात दिवा स्थानकाच्या पूनर्विकासासाठी तब्बल ४५ कोटी रुपये निधी मिळणार आहे. तसेच कसारा मार्गिकेवरील टिटवाळा स्थानकाच्या पूनर्विकासासाठी २५ कोटी रुपये निधी मिळणार आहे.

गेल्याकाही वर्षांमध्ये दिवा शहरात मोठ्याप्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. सर्वाधिक गर्दीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक दिवा रेल्वे स्थानक आहे. तसेच कसारा मार्गिकेवरील टिटवाळा रेल्वे स्थानकातूनही लाखो प्रवासी दिवसाला वाहतुक करत असतात. भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा, शहाड, दिवा आणि बेलापूर यासह काही महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. यामुळे या भागातील प्रवाशांना आधुनिक सुविधांचा लाभ घेता येणार असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेची माहिती दिली. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातून निवडलेल्या स्थानकांपैकी दिवा स्थानकाच्या पूनर्विकासासाठी ४५ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. तर टिटवाळा या स्थानकाच्या पूनर्विकासासाठी २५ कोटी रुपये इतका निधी दिला जाणार आहे. शहाड रेल्वे स्थानकाच्या पूनर्विकासासाठी ८.४ कोटी रुपये इतका तर नवी मुंबईतील बेलापूर स्थानकाच्या पूनर्विकासासाठी ३२ कोटी रुपये इतका निधी दिला जाणार आहे.

योजनेद्वारे काय विकास होणार

– या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, उद्वाहक, सरकते जिने आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील पुनर्विकासासाठी निवडलेल्या स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे:

* टिटवाळा स्थानक : २५ कोटी रुपये

* शहाड स्थानक : ८.४ कोटी रुपये

* दिवा स्थानक : ४५ कोटी रुपये

* बेलापूर स्थानक : ३२ कोटी रुपये