लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : महापालिकेच्या सफाई खात्यात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सुमारे ४५ सफाई कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन थकविणाऱ्या ठेकेदाराला बदलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर कामगारांना दोन थकीत वेतन आणि भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भरल्यानंतर उर्वरित वेतनही देण्याचे प्रशासनाने मान्य केले. भाजपाच्या प्रयत्नामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे.

ठाणे महापालिकेने सफाई खात्यात कंत्राटदाराद्वारे ४५ हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांना कंत्राटदाराकडून वेतन दिले जाते. परंतु तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यामुळे कर्मचारी हवालदील झाले होते. या कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कमही सरकारकडे जमा केलेली नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यांची महापालिकेकडून दखल घेतली जात नव्हती.

आणखी वाचा-ठाणे : ३० लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त

त्याचदरम्यान महापालिका मुख्यालयात पोचलेले भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे, नारायण पवार आणि परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील यांनी कामगारांची व्यथा जाणून घेतली. आणि त्यानंतर महापालिकेचे उपायुक्त तुषार पवार यांची कामगारांच्या प्रतिनिधींसमवेत भेट घेतली. तातडीने वेतन देण्याबाबत आदेश देण्याची मागणी त्यांनी केली. अखेर या प्रश्नावर उपायुक्त तुषार पवार यांनी मंगळवारी दोन महिन्यांचे वेतन कामगारांना देणार असल्याचे आश्वासन दिले. तर कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भरल्यानंतर उर्वरित वेतनही देण्याचे मान्य केले. संबंधित कंत्राटदाराऐवजी येत्या १ सप्टेंबरपासून नव्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंत्राटदाराकडे सध्याच्या कर्मचाऱ्यांना वर्ग करण्याचे आश्वासनही उपायुक्त पवार यांनी दिले. या निर्णयामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 45 sweepers of thane municipality will get arrears mrj
Show comments