शंभरहून अधिक इमारती अतिधोकादायक असल्याचा अहवाल
ठाणे शहरातील बेकायदा आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनासाठी समूह विकास योजनेची आखणी केली जात असली तरी यंदाच्या पावसाळ्यातही धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांवर टांगती तलवार कायम रहाणार आहे. महापालिकेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या महापालिका हद्दीत ४५०७ धोकादायक इमारती आढळून आल्या आहेत. त्यापैकी १०३ इमारती अतिधोकादायक म्हणून गणल्या गेल्या असून त्या रिकाम्या करून पाडण्याची कारवाई पालिकेने सुरू केली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच नौपाडा परिसरात सर्वाधिक अतिधोकादायक इमारती असून, यापूर्वी वागळे इस्टेट परिसर अतिधोकादायक इमारतीत आघाडीवर होता. वागळे इस्टेट परिसरातील बहुतांश अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त केल्याने या विभागात आता तीन अतिधोकादायक इमारती असल्याचे महापालिकेच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. वागळे इस्टेट परिसरात समूह विकास योजनेच्या माध्यमातून पुनर्विकास योजना राबवली जाणार आहे. मात्र येथील इमारतींचे सर्वेक्षण आणि पुढील प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्याने या भागातील रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत वागळे इस्टेट परिसरात धोकादायक इमारतींच्या संख्येतही दोनशेने घट झाली आहे.
ठाणे, वागळे, कळवा आणि मुंब्रा या भागांत मोठय़ा प्रमाणात बेकायदा इमारती आहेत. अशा इमारती पावसाळ्यात कोसळून त्यामध्ये जीवितहानी झाल्याच्या घटना गेल्या काही वर्षांत घडल्या आहेत. शीळ येथील लकी कंपाऊंड इमारत दुर्घटनेत ७४ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच नौपाडय़ातील जुन्या अधिकृत इमारतीही मोडकळीस आल्या असून याठिकाणीही इमारत दुर्घटना घडल्या आहेत. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासन पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून यादी तयार करते. त्यानंतर या यादीतील अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून त्या पाडण्याची कारवाई करते. यंदाही महापालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक इमारतींची यादी तयार केली असून त्यानुसार शहरात ४ हजार ५०७ धोकादायक इमारती असल्याची बाब समोर आली आहे.
गेल्यावर्षी महापालिकेने जाहीर केलेल्या यादीमध्ये धोकादायक इमारतींची संख्या ४ हजार ७०५ इतकी होती. त्यामुळे यंदाची आकडेवारी पाहता धोकादायक इमारतींच्या संख्येत दोनशेने घट झाल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी अतिधोकादायक इमारतींची संख्या ९५ इतकी होती. तर यंदा अतिधोकादायक इमारतींची संख्या १०३ इतकी झाली आहे.
दरम्यान, ‘ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींची यादी तयार करण्यात आली असून त्यामध्ये १०३ अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. १५ जूनपर्यंत ही कारवाई पूर्ण केली जाणार आहे,’ अशी माहिती उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली.
नौपाडय़ात अतिधोकादायक इमारती अधिक
अतिधोकादायक इमारतींच्या आकडेवारीत नौपाडा परिसर आघाडीवर असला तरी धोकादायक इमारतींच्या आकेडवारीत मुंब्रा आणि वागळे इस्टेट परिसर आघाडीवर आहे. ठाणे महापालिकेने धोकादायक इमारतींचे सी-१, सी-२ए , सी २ बी आणि सी ३ अशा चार टप्प्यांत वर्गीकरण केले असून त्यामध्ये सी -१ इमारती अतिधोकादायक, तर उर्वरित तीन टप्प्यांतील इमारती धोकादायक म्हणून गणल्या जातात. त्यानुसार मुंब्रा परिसरात १ हजार ४४१, तर वागळे इस्टेट परिसरात १ हजार ८६ इतक्या धोकादायक इमारती आहेत.
धोकादायक इमारतींच्या श्रेणी
* सी १ – या श्रेणीमधील इमारती अतिधोकादायक म्हणून गणल्या जातात आणि त्या रिकाम्या करून पाडल्या जातात.
* सी २ – या श्रेणीतील इमारती धोकादायक म्हणून गणल्या जातात. त्यांची दुरुस्ती करता येते.
* सी २ बी – या श्रेणीमधील इमारती धोकादायक म्हणून गणल्या जातात. या इमारतींमध्ये रहिवासी राहत असले तरी त्या दुरुस्त करता येऊ शकतात.
* सी ३ – या श्रेणीमधील इमारती धोकादायक म्हणून गणल्या जात असून अशा इमारती किरकोळ ना दुरुस्त असतात.