उल्हासनगरः शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर बेकायदा पद्धतीने जोडणी करत पाणी चोरणाऱ्यांवर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरूवात केली आहे. नुकतेच पालिकेने अशा मुख्य जलवाहिनीवरील ४६ अनधिकृत जोडण्या तोडल्या आहेत. येत्या काळात पुन्हा या जोडण्या केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यास मदत होणार असल्याची पालिकेला आशा आहे.

उल्हासनगर शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी अनेकदा निर्णय घेतले गेले. मात्र त्यात काही अंशी सुधारण झाली असली तरी गळती, चोरीचे प्रमाणही कायम आहे. शहरातील पाणी समस्यांवर चर्चा करण्यासाठी नुकतीच एका विशेष बैठतीचे आयोजन उल्हासनगर महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. या बैठकीत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांचा प्रश्न चर्चिला गेला. मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांमुळे अधिकृत ग्राहकांना पाणी पुरवण्यात अपयश येते. त्यामुळे नागरिकांना हक्काचे पाणी मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे या मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्या काढून टाकण्यावर बैठकीत एकमत झाले. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर आणि किशोर गवस यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या काढून टाकण्याचे निर्देश दिले. नुकतीच पालिकेच्या वतीने ही कारवाई सुरू करण्यात आली. यात पहिल्या टप्प्यात  उल्हासनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गायकवाड पाडा येथील पाले जोडणी येथून कारवाईला सुरूवात करण्यात आली. या ठिकाणी मुख्य जलवाहिनीवर असलेल्या २२ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. त्यानंतर पुढच्या भागातील २४ अनधिकृत नळ जोडण्या तोडण्यात आल्या. अनधिकृत नळजोडण्या काढण्यात आल्या असल्या तरी भविष्यात अशा नळजोडण्या होणार नाही यासाठी पालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे अशा नळ जोडण्या करणाऱ्यांवर यापुढे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिता पालिका प्रशासनाने दिले आहे. अनधिकृत नळजोडण्या तोडल्याने पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची आशा आहे.

Story img Loader