ठाणे महापालिकेच्या वृक्ष समितीपुढे प्रस्ताव सादर
ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना चांगली आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर सुपर स्पेशलीटी रुग्णालय उभारण्यात येणार असून या रुग्णालयाच्या नुतनीकरण कामात एकूण ७१ पैकी ४७ वृक्षांचा अडथळा निर्माण होत असल्याने त्यांचे पुर्नरोपण करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. २२ वृक्षांचा अडथळा नसल्याने ती वृक्ष जैसे थेच राहणार आहेत. तर, दोन वृक्ष हेरीटेज असल्याने त्यांचा प्रस्ताव राज्याच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे, अशी माहीती सुत्रांनी दिली.
हेही वाचा >>> कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मामणोली येथे हमीभाव भात खरेदी केंद्र
ठाणे जिल्हा रुग्णालय सद्यस्थितीत ३०० खाटांच्या क्षमतेचे आहे. या रुग्णालयाच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे या रुग्णालयाचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. या जागेवर सुरुवातीला ५४७ खाटांचे सुपर स्पेशलीटी रुग्णालय उभारणीस राज्य शासनाने मंजुरी दिली होती. त्यानंतर याठिकाणी ९०० खाटांचे १० मजली रुग्णालय, १० परिचारीका प्रशिक्षण केंद्र आणि वस्तीगृह उभारणीस राज्य शासनाने मंजुरी दिली. या आराखड्यास मंजुरी मिळाल्यानंतर येथील अनेक विभाग मनोरुग्णालयाजवळील नवीन वास्तुत स्थलांतरीत करण्यात आले असन त्याचबरोबर नुतनीकरणासाठी आवश्यक असलेल्या विविध स्वरुपाच्या परवानग्या घेण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. यामुळे सुपर स्पेशलीटी रुग्णालय उभारणीच्या कामाला येत्या काही महिन्यात सुरुवात होणार असून त्यासाठी या कामात अडसर ठरणाऱ्या वृक्षांच्या पुर्नरोपणाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.
हेही वाचा >>> ठाणे रेल्वे स्थानकातील दुर्गंधीने प्रवासी हैराण
ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एकूण ७१ वृक्ष आहेत. त्यापैकी २२ वृक्षांचा रुग्णालय नुतनीकरणाच्या कामात अडसर ठरत नसून यामुळे हे वृक्ष वाचणार आहेत. परंतु ४७ वृक्ष रुग्णालय नुतनीकरण कामात बाधित होणार असून त्यांचे मनोरुग्णालयाच्या जागेत पुर्नरोपण करण्यात येणार आहे. याशिवाय, वावळा आणि सोनमोहर असे दोन ५० वर्षे जुने हेरीटेज वृक्ष असून तेही रुग्णालय कामात बाधित होणार आहेत. त्यामुळे अशा ४९ वृक्षांच्या पुर्नरोपणाचा प्रस्ताव पालिकेच्या वृक्ष समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. ४७ वृक्षांच्या पुर्नरोपणाच्या प्रस्तावावर पालिका वृक्ष प्राधिकरण समिती निर्णय घेणार असली तरी हेरीटेज वृक्षांबाबत समितीला निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे या दोन्ही वृक्षांचा प्रस्ताव राज्य शासनाच्या समितीपुढे मंजुरीसाठी पाठविले जाणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.