सुट्टीच्या दिवशीही ठाण्यातील रस्त्यांवरील दुरुस्तींच्या कामांना वेग;
रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी महापालिका यंत्रणेचे युद्धपातळीवर काम
रस्त्यावरील खड्डे भरणे, डेब्रीज तसेच नाल्यातील गाळ उचलून नालेसफाई करण्यासाठी ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ४८ तासांची मुदत महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिली होती. पावसाळ्यापूर्वीच्या या कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत आयुक्तांनी दिल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशीही महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांची कामे युद्धपातळीवर सुरू होती. रविवारी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून या कामांच्या पुर्ततेसाठी प्रयत्न सुरू केले होते. एकूणच शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये कामांच्या लगबगीने मोठा वेग घेतला होता.
ठाणे शहरातील पावसाळ्यापूर्वीच्या कामांची मे महिन्यापासून कामे सुरू असून अद्याप त्यातील अनेक कामे अपूर्ण अवस्थेत आहे. रस्त्यावरील खड्डे भरणे, डेब्रीज तसेच नाल्यातील गाळ उचलणे, पदपथांची दुरूस्ती, तुटलेल्या गटारांची झाकणे बसवणे अशी कामे तात्काळ पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. पाऊस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने ही कामे पुढील दोन दिवसात पूर्ण करणे गरजेचे होते. ठाणे महापालिका आयुक्तांनी शनिवारी या संदर्भात उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, नगरअभियंता, उपनगर अभियंता आणि कार्यकारी अभियंतांची बैठक घेऊन त्यांना प्रभागनिहाय पाहणी करून कामे पूर्ण करून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. रस्ता रूंदीकरणाच्या कारवाईमुळे रस्त्यांवर पडलेले बांधकाम साहित्य तात्काळ हटवण्याचे आदेश देण्यात आले. तर ७ जूनपर्यंत नालेसफाईची कामे १०० टक्के पूर्ण करण्याची अखेरची मुदत असून या कामामुळे पदपथ आणि रस्त्यांवर साठलेला गाळ हटवण्याची सूचना आयुक्तांनी दिल्या. आयुक्तांनी दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी रविवारी सकाळपासून महापालिकेच्या अधिकाऱ्यांची लगबग प्रत्येक प्रभागात सुरू होती. जेसीबी मशिनच्या सहाय्याने गटाराच्या काठांवरील, रस्त्यांवरील आणि पदपथांवरील गाळ हटवण्यास सुरूवात झाली होती.
अधिकाऱ्यांची देखरेख
रविवारी सकाळपासून अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण आणि अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब यांच्या अधिपत्त्याखाली संपूर्ण शहरभर सर्व उपायुक्त, नगर अभियंता, सर्व उपनगर अभियंता, सहाय्यक आयुक्त आदी सर्व अधिकारी मिळून फिरून कामावर नियंत्रण आणि निरीक्षण करीत होते. यामध्ये रस्त्यावरील खड्डे भरणे, रस्त्यावरील डेब्रीज उचलने, नाल्यावरील गाळ उचलने तसेच रस्त्यांच्या दुरूस्ती कामांचा समावेश होता, अशी माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली.